
एसटी महामंडळाची लालपरी येत्या 1 जूनला 75 व्या वर्षांत पर्दापण करीत असून त्यानिमित्ताने पुणे येथे आयोजित वर्धापन दिन सोहळय़ात महामंडळाच्या पहिल्या इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन प्रणालीद्वारे ‘शिवाई’चे उद्घाटन करणार असल्याचे परिवहनमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
1 जून 1948 रोजी एसटीची पहिली बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावली होती. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी पुणे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘शिवाई’चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ही बस पुणे ते नगर या मार्गावर धावेल. याशिवाय विद्युत प्रभारक केंद्राचेही उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, नगर येथूनही शिवाई बस सुटणार आहे. ही बस पुण्यापर्यंत धावेल. 1 जून 1948 रोजी नगर येथून धावलेल्या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मणराव केकटे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले.

























































