‘दप्तर घ्या, बकऱ्या द्या’ , शिंदे सरकारच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कमी विद्यार्थी असलेल्या मराठी शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिकच्या जिल्हा परिषदेसमोर काही विद्यार्थ्यांनी एक अनोखे आंदोलन केले. दप्तर घ्या व बकऱ्या द्या अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध केला.

गतपुरी तालुक्यात असलेल्या दरेवाडी या अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. या विद्यार्थ्यांच्या शाळेत 40 ते 50 विद्यार्थी शिकत होते. राज्य सरकारने कमी पटसख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. शाळेबाबत निर्णय होईपर्यंत त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्हापरिषदेसमोर दप्तर घ्या, बकऱ्या द्या आंदोलन केलं.

आमची शाळा बंद झाल्याने आता बकऱ्या चारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाहीये. त्यामुळे आमचे दप्तर काहीच कामाचे उरले नसल्याने ते जिल्हा परिषदेकडे जमा करून त्यांच्याकडून बकऱ्या घेण्यासाठी आलो आहोत असे आंदोलन करणाऱ्या  विद्यार्थ्यांनी सांगितले.