
सामना प्रतिनिधी, मुंबई
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहीत करणार नाही, तसेच निरा देवधर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने देण्यात येतील, अशी ग्वाही शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी खंडाळ्याहून आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिली.
साताऱ्यातील खंडाळा औद्योगिक किकास क्षेत्रातील (एमआयडीसी) जमिनीबाबत आरोप करीत स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी या शेतकऱ्यांना चर्चेसाठी मंत्रालयात बोलावले. उद्योग मंत्र्यांच्या आश्वासनानंतर साताऱ्यातील धनगरकाडी, केसुर्डी, शिवाजी नगर, खंडाळा, बावडा, मोर्वे, भादे, अहिरे गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. शेतकऱ्यांसोबत झालेल्या यशस्वी वाटाघाटीनंतर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांना माहिती दिली. सुभाष देसाई म्हणाले, खंडाळा टप्पा क्रमांक-1मधील शिल्लक राहिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 15 टक्के परताव्याची जमीन खंडाळा टप्पा-2मध्ये देण्यात येईल. तर खंडाळा टप्पा-2मधील हरकत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात येणार नाहीत. खंडाळा टप्पा-3मधील ज्या जमिनी लाभक्षेत्राखालील आहेत त्या जमिनी वगळण्यात येतील व या टप्प्यामधील ज्या जमिनी महामंडळाच्या ताब्यात आहेत त्या जमिनीला संलग्नता असलेले क्षेत्र संमतीने घेण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात प्रमोद जाधव, सतीश कचदे, रवींद्र ढमाळ, आनंद ढमाळ, युवराज ढमाळ, दत्तात्रय हाके यांचा समावेश होता. यावेळी उद्योग विभागाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी आबा मिसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास पानसरे, कोल्हापूर प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव, कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, वाईच्या उपविभागीय अधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले उपस्थित होते.
स्थानिकांना रोजगार
खंडाळा औद्योगिक क्षेत्रात आतापर्यंत 3 हजार 926 रोजगारांपैकी 2 हजार 489 रोजगार स्थानिक लोकांना देण्यात आलेले आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे अधिक स्थानिक लोकांना रोजगार देण्यात येतील. जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनासाठी झालेल्या विलंबाबाबत उद्योग मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. या विलंबाबाबत संबधित अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची चौकशी करण्याची महसूल मंत्र्यांना विनंती करण्यात येईल, असेही उद्योग मंत्री म्हणाले.
























































