ऐन सणाच्या दिवशीच आयुष्य संपविले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

रक्षाबंधनसारख्या सणाच्या दिवशीच रविवारी मराठवाडय़ात आत्महत्या व खुनाच्या घटना घडल्या आहेत. बीड जिल्हय़ातील गेवराई तालुक्यात एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली, तर दोन महिलांसह इतर तीन जणांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हय़ातील वडवणी तालुक्यात मुलीच्या शिक्षणासाठी आईने आयुष्य संपवले आहे. धाराशिव जिल्हय़ातील कळंब तालुक्यातही शेतकऱ्याने गळफास घेतला आहे. नांदेड जिल्हय़ात पुतण्यानेच डोक्यात रॉड घालून चुलत्याचा खून केल्याची घटना घडली आहे

गेवराईमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
गेवराई – राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले असले तरी शेतकरी आत्महत्येचे सत्र अद्यापपर्यंत थांबलेले नाही. गेवराई तालुक्यातील एका 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने रात्री विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तालुक्यातील खांडवी येथील विनायक विश्वनाथ नाईकवाडे या शेतकऱयाकडे दीड एकर शेती आहे. या शेतीमध्ये तीन वर्षांपासून त्याला उत्पन्न निघाले नसल्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात अडकला होता.

नापिकीमुळे शेतकऱ्याचा गळफास
कळंब – तालुक्यातील डिकसळ येथे आज दुपारी तीनच्या सुमारास मधुकर किठ्ठल अंबिरकर (64) यांनी परसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी आणि हातउसने घेतलेली रक्कम कशी फेडायची या विवंचनेत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मधुकर यांची पाच एकर दोन गुंठे शेती आहे. रविवारी गावातील मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात आरतीमध्ये मधुकर यांनी सहभाग घेतला होता. नंतर संपूर्ण गाव मंदिराच्या आवारातच झोपले, परंतु मधुकर यांनी घरी येऊन आत्महत्या केली. त्यांना पत्नी, दोन मुले व चार मुली आहेत.

मुलीच्या शिक्षणाला पैसे नसल्यामुळे आईने पेटवून घेतले
वडवणी – दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून मुलीला वैद्यकीय पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी लातूरला ठेवले. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने मुलीचा नंबर दंतवैद्यक शाखेला लागला. एवढे होऊनही तिच्या प्रवेशासाठी पैसेच नसल्याने आईने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना कडकणी तालुक्यातील साळिंबा येथे घडली आहे. तिला डॉक्टर व्हायचे होते. दोन वर्षांपासून ती वैद्यकीय पात्रता परीक्षेची तयारी करत होती. तिला चांगले गुण मिळाले. परंतु आरक्षण नसल्याने तिला बीडीएसला प्रवेश घ्यावा लागणार होता, परंतु पैशाअभावी हा प्रवेशही होऊ शकला नाही.