मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, सुनील कावळे यांनी मुंबईत गळफास घेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे जालन्यातील कार्यकर्ते सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत वांद्रे येथील उड्डाणपुलावरील विजेच्या खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कावळे यांनी पांढऱया रंगाचा सदरा घातला होता. त्यावर मराठा आरक्षणाच्या घोषणा लिहिलेल्या होत्या. ‘मी मराठा आरक्षणासाठी बलिदान देत आहे’, अशी चिठ्ठी लिहून ठेवत त्यांनी मृत्यूला कवटाळले.

सुनील बाबुराव कावळे (45) हे जालना जिह्यातील अंबड तालुक्यातल्या चिकनगावचे रहिवासी. बुधवारी रात्री सवाएक वाजण्याच्या सुमारास कावळे हे वांद्रे येथील उड्डाणपुलावरील विजेच्या खांबाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत कळताच खेरवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कावळे यांना शीव रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले.

सर्व मराठा आंदोलनांत सक्रिय सहभाग

कावळे यांच्याकडे मृत्यूपूर्वी लिहिलेली चार पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यात त्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देत असल्याचे म्हटले आहे. शिवाय आता माघार नाही, एकच मिशन मराठा आरक्षण, कोणी काहीही बोलू द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचे नाव तोंडातून काढू नका. आता फक्त आणि फक्त मराठा आरक्षण. या 24 ऑक्टोबरला मराठा आरक्षण दिवस, या मुंबईत या, पण लक्षात ठेवा शांततेत यायचं असेही त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. कावळे यांनी आतापर्यंत झालेल्या सर्व मराठा आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला होता. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका होती आणि त्याचसाठी त्यांनी बलिदान दिले असे सुनील कावळे यांचा मुलगा नागेश याने सांगितले. मराठा आरक्षण मिळाले तरच माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती लागेल असेही तो म्हणाला. कावळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे.

पावणे एकला स्टेटस ठेवला

आत्महत्या करण्याच्या काही मिनिटांआधी सुनील कावळे यांनी चार पानांची चिठ्ठी स्टेटसला ठेवली होती. शिवाय मी काही कोणाबरोबर मुंबईला नाही आलो. मी स्वतः आलो आहे. मी आज मराठा समाजासाठी बलिदान देत आहे. एक मराठा लाख मराठा, आता माघार नाही. एकच मिशन मराठा आरक्षण, जय हिंद, जय महाराष्ट्र… असा स्टेटस कावळे यांनी ठेवला होता. पण हा स्टेटस पाहिला तोवर फार उशीर झाला होता, असे कावळे यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

मला क्षमा करा

मला करू वाटलंय मी केलं, मला मोठय़ा मनाने माफ करा. मी क्षमा मागतो सर्वांची. माफ करा मला. फक्त आरक्षण… फक्त आरक्षण… असेही कावळे यांनी चिठ्ठीत लिहिले असून आत्महत्या करताना त्यांनी एका पांढऱया रंगाचा सदरा घातला असून त्यावरदेखील मराठा आरक्षण असे सर्वत्र लिहिलेले होते.

…अन्यथा उद्रेक अटळ – विनोद पाटील

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत 48 जणांनी बलिदान दिले आहे. याला जबाबदार कोण, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला कधी जाग येणार, अशा प्रश्नांची सरबत्ती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा, असे नमूद करताना आणखी मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलावीत, नाहीतर उद्रेक अटळ आहे, असा इशारा पाटील यांनी दिला. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका, असे आवाहनही त्यांनी मराठा आंदोलकांना केले.

तो कॉल झाला असता तर…

बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुनील कावळे हे वांद्रे येथून बीकेसीला जाणाऱया उड्डाणपुलावर आले. आत्महत्या करण्यापूर्वी कावळे यांनी त्यांच्या एका नातेवाईकाला कॉल केला होता. नातेवाईकाने कॉलदेखील उचलला, पण बोलणं होऊ शकलं नाही. पहाटे साडेपाच वाजता त्या नातेवाईकाने पुन्हा कावळे यांना फोन केला तेव्हा तो फोन पोलिसांनी उचलला आणि घडला प्रकार सांगितला. जर साडेबारा वाजता बोलणं झाले असते तर कदाचित सुनील काका आज आपल्यात असते असे कावळे यांचा पुतण्या भरत कावळे याने सांगितले.