महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरण – सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली पोलिसांना नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर शड्डु ठोकला आहे. महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करणाऱ्या भाजप खासदार ब्रजभूषण यांच्या विरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी बजरंग पुनिया याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालं. कुस्तीपटूंनी न्यायाची याचना करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.

कुस्ती अध्यक्षांविरोधात एफआयआरसाठी कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात आंदोलकांनी अर्ज केला होता. परंतु अर्जावर विचार करण्यास दिल्ली पोलिसांनी नकार दिला होता. त्यानंतर सगळ्या कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आपलं म्हणणं मांडलं आहे. याचिका दाखल करताना दिल्ली पोलीस आयुक्तांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी या खेळाडूंनी केली.

त्या याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी कुस्तीपटूंची बाजू मांडली. त्यांनी केलेल्या युक्तिवादानुसार, ब्रजभूषण सिंह यांनी खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. एकूण सात महिला कुस्तिपटूंचा लैंगिक छळ करण्यात आला आहे. यापैकी एक तर छळावेळी अल्पवयीन होती आणि तिने सुवर्णपदक मिळवलं आहे. तसंच, या प्रकरणात खेळाडूंची तक्रार दाखल करून घेण्यास नकार देणाऱ्या पोलिसांविरुद्धही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी सिब्बल यांनी केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून त्यांचं उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, येत्या 7 मे रोजी होणारी कुस्ती महासंघाची निवडणूक हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेने पुढे ढकलली आहे. कुस्ती महासंघाच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी हंगामी समितीची निवड करण्यात आली आहे. ही समिती येत्या 45 दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करील.