
वेबसीरीजमध्ये आक्षेपार्ह दृश्ये दाखवून देशातील युवा पिढी बिघडवण्याचे काम करत आहात, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज निर्माता एकता कपूरला फटकारले.
अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘ट्रिपल एक्स 2’ च्या वेबसीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नींचे आक्षेपार्ह दृश्य दाखवल्याबद्दल बिहारमधील बेगुसराय येथील जिल्हा न्यायालयाने एकता कपूर आणि तिच्या आईविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. त्या विरोधात एकता कपूरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणाची सुनावणी न्या. अजय रस्तोगी आणि सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी झाली.
‘याविरोधात काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही देशातील तरुणांना बिघडवत आहात. ओटीटीचा कंटेट सर्वत्र उपलब्ध असतो. लोकांना तुम्ही कोणता पर्याय देत आहात? उलटपक्षी नव्या पिढीचे मन कलुषित करताय,’ अशा शब्दांत न्यायालयाने एकताला फटकारले. या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित ठेवण्यात आली आहे.
























































