
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत केलेल्या कॉलेजियमच्या शिफारशी स्वीकारण्यास केंद्र सरकारने विलंब केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करतानाच कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका असा इशारा दिला आहे. पुढील सुनावणी 13 फेब्रुवारी रोजी होईल.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये होणाऱया विलंबाच्या पार्श्वभूमीवर एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. या प्रकरणी केंद्राने कॉलेजियम व्यवस्थेवर एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. सरकारने त्यावर शपथपत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयातील 5 न्यायमूर्तींच्या नियुक्तीसंबंधीची कॉलेजियमची शिफारस लवकचर मान्य केली जाईल असे अटॉर्नी जनरल यांनी स्पष्ट केले. यावेळी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्यांच्या शिफारशींना मंजुरी देण्यात होणाऱया विलंबावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदरची बाब अत्यंत गंभीर असल्याचे बजावले. तुम्हाला त्रास होईल अशी भूमिका घेण्यास आम्हाला मजबूर करू नका, अशा शब्दांत खडसावले.




























































