
शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला आला आहे. दुधाला भाव नाही. शेतकऱयांना अनुदान मिळाले पाहिजे. तसेच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी घातली आहे, ती उठवली नाही तर सरकार विरोधात हातात रुमणे घेणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे यांनी दिला. आज जामखेड येथे शेतकरी आक्रोश मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील खर्डा चौकात भव्य असा आक्रोश मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तास आक्रोश मोर्चामुळे खर्डा चौकात वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शेतकऱयांनी सरकार विरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
मंगेश आजबे म्हणाले, शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला आला आहे, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केली आहे. दुधाला भाव नाहीत, शेतकऱयांना अनुदान मिळाले पाहिजे, तसेच पंचायत समिती व कृषी विभागाचे लाभ नगरपरिषद हद्दीतील शेतकऱयांना मिळत नाहीत ते मिळाले पाहिजेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा अशी मागणी केली आहे.
सुनील लोंढे म्हणाले, कांदा निर्यात बंदीने शेतकऱयांना रडकुंडीला आणले आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजना ही फक्त सातबारा नावावर असणारांनाच मिळते. शेतमजुरांना मिळत नाही यासाठी राज्यभरात आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
यावेळी निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार मनोज भोसेकर म्हणाले, आंदोलनादरम्यानचे सर्व विषय आम्ही शासनास कळवू तसेच तालुका पातळीवरील विषय आम्ही मिटिंग घेऊन ताबडतोब सोडवू. जामखेड तालुक्यातील चार हजार शंभर शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. सुमारे दोन कोटी 27 लाख बाकी आहे. यासंदर्भात वरती कळवले असून, मार्च अखेरीला पैसे येतील असे त्यांनी सांगितले.
बब्रुवान वाळुंजकर, काका चव्हाण, भीमराव पाटील, गणेश हगवणे, कृष्णा चव्हाण, नय्युम शेख आदी शेतकरी उपस्थित होते. नायब तहसीलदार मनोज भोसेकर, पोलीस निरीक्षक महेश पाटील, राजेंद्र सुपेकर, डॉ. संजय राठोड उपस्थित होते.
प्रत्येक अधिकाऱयाचे मो.नंबर ग्रामपंचायतमध्ये लावणार
n शेतकऱयांना अनेक अडचणी येतात. त्यावेळी त्यांना कोणाला भेटायचे, कधी भेटायचे त्यांचे मोबाईल नंबर नसतात. त्यामुळे यापुढे ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे मो.नंबर लावण्यात येतील.
























































