
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई-पुणे-मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर असे हिट चित्रपट आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट सारखी मालिका देणारी जोडी म्हणजे स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे. या दोघांनाही प्रचंड चाहता वर्ग लाभला आहे. या चाहत्या वर्गाने मिळून रावा नावाचं एक फॅनपेज तयार केलं आहे. या फॅन पेजने सुरू केलेला एक उपक्रम सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.
आपण समाजाचा एक भाग असतो. त्यामुळे समाजाचे आपण देणे लागतो. समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही तरी करण्याची गरज असते. याच विचाराने रावाने ‘एक छत्री माणुसकीची’ हा एक उपक्रम राबवला आहे. पावसाळा जवळ आला की, आपण प्रत्येक जण छत्री, रेनकोट यांची शॉपिंग करायला लागतो. काही वेळा तर गेल्या वर्षीची आपली छत्री, आपला रेनकोट चांगला असला तरी नवीन घेण्याकडे आपला कल असतो. बाजारात नवीन ट्रेंड आला की, त्याप्रमाणेच आपली छत्री, रेनकोट असला पाहिजे असे सगळ्यांना वाटत असते. पण काही रस्त्यावर राहाणाऱ्या, भीक मागून आपले आयुष्य जगणाऱ्या, दोन वेळेचे खाणे मिळणे देखील मुश्कील असणाऱ्या लोकांकडे छत्री घेण्याची ऐपत नसते. अशा लोकांना आपण वापरत नसलेली छत्री अथवा रेनकोट दिला तर पावसापासून त्यांचा बचाव होऊ शकतो. त्यामुळे रावा कुंटुंबाने एक छत्री माणुसकीची या उपक्रमाद्वारे अशा गरजू लोकांना आपली छत्री, रेनकोट देण्याचे आवाहन केले आहे आणि या कार्यात लोक मोठ्या प्रमाणात मदत देखील करत आहेत.
लोकांनी अधिकाधिक या उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, तेजश्री प्रधान, समीधा गुरू यांसारख्या सेलिब्रेटींनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलेले आहे.

























































