पंडय़ाला वाचवले, राहुलला बसवले; टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानचा अनुभवी संघ

कुणाला डावलायचे आणि कुणाला निवडायचे या संभ्रमात अडकलेल्या निवड समितीने मध्यम मार्ग काढताना काहींना वाचवत आणि काहींना बसवत आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानच्या अनुभवी संघाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माकडे संघाचे पुन्हा एकदा नेतृत्व सोपविण्यात आले असले तरी आयपीएलमध्ये अपयशी ठरूनही हार्दिक पंडय़ाला वाचवण्याची किमया निवड समितीने करून दाखवली आणि त्याला उपकर्णधारपदही दिले. मात्र अंतिम संघात स्थान मिळवण्यात नेहमीच यशस्वी ठरणाऱया के. एल. राहुलला बसवण्याचे धाडसही दाखवले. तसेच हिंदुस्थानचा तिन्ही क्रिकेटचा स्टार असलेल्या शुबमन गिलला थेट राखीव संघात स्थान दिले आहे.

हिंदुस्थानच्या संघाची निवड करताना आघाडीच्या तसेच यष्टिरक्षकाच्या स्थानासाठी प्रचंड संघर्ष असल्यामुळे एकाची निवड करणे निवड समितीला शक्य नव्हते. त्यामुळे निवड समितीने के. एल. राहुलला वगळताना सध्या फॉर्मात असलेल्या संजू सॅमसनची दुसरा यष्टिरक्षक म्हणून निवड करत त्याच्या खेळाला न्याय दिला आहे. त्याचप्रमाणे ऋषभ पंतला मुख्य यष्टिरक्षक म्हणून कायम ठेवले आहे. कार अपघातात जखमी झालेला पंत तब्बल दीड वर्षानंतर हिंदुस्थानी संघात पुनरागमन करील.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये मुंबईचाच आवाज

हिंदुस्थानी संघात मुंबईचे नेहमीच तीन-चार खेळाडू असतातच. ती परंपरा मुंबई यंदाही कायम राखण्यात यश मिळवले आहे. मुंबईकर रोहित शर्माकडे मुंबईचे नेतृत्व होते आणि सूर्यकुमार यादवचेही स्थान पक्के होते. पण यशस्वी जैसवालनेही संघात स्थान मिळवले असून सध्या आपल्या झंझावाती फलंदाजाने सर्वांचे मनोरंजन करणारा शिवम दुबेही वर्ल्ड कपचे तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे यंदाही वर्ल्ड कपमध्ये मुंबईचाच आवाज घुमणार हे निश्चित झाले आहे.

आयपीएलच्या कामगिरीची दखल

निवड समितीने हिंदुस्थानी संघात अपयशी ठरूनही पूर्वपुण्याईच्या जोरावर काही खेळाडूंची निवड केली. मात्र आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱया खेळाडूंनाही संघात स्थान देत खेळाडूंना न्याय दिला आहे. यात संजू सॅमसन, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंची निव्वळ आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर निवड केली आहे. मात्र ऋतुराज गायकवाड, हर्षित राणा, रियान पराग, दिनेश कार्तिक, टी. नटराजनसारख्या खेळाडूंना स्थान मिळवता आलेले नाही.

राखीव खेळाडूंमध्ये गिल-रिंकू

हिंदुस्थानच्या अंतिम संघात 15 खेळाडूंची निवड करताना अजित आगरकरच्या निवड समितीला प्रचंड कसरत करावी लागली आहे. संघ निवडल्यानंतर वाद होऊ नये तसेच अनुभवी खेळाडूंनाही संघात स्थान दिले जावे असे संतुलन साधताना निवड समितीने राहुलला वगळण्याचा निर्णय घेतला. तसेच शुबमन गिल आणि रिंकू सिंगला वगळणे कठीण असल्यामुळे त्यांना राखीव संघात स्थान देऊन वाद टाळला आहे. तसेच आयपीएलमध्ये अचूक आणि भेदक गोलंदाजी करणाऱया खलिल अहमद आणि आवेश खान यांनाही राखीव खेळाडू म्हणून वर्ल्ड कप वारीचे तिकीट दिले आहे. मात्र आयपीएलमध्ये पूर्णतः अपयशी ठरलेल्या मोहम्मद सिराजवर पुन्हा विश्वास दाखवत त्याला आणखी एक संधी दिली आहे.

हिंदुस्थानी संघ 31 वर्षांचा

टी-20 वर्ल्ड कपसाठी नेहमीच तरूण तडफदार खेळाडूंची निवड केली जाते, पण निवड समितीने अनुभवाला प्राधान्य दिले आहे. यात तिशीतले केवळ पाच खेळाडू असून उर्वरित दहाही खेळाडू तिशीपलीकडचे आहेत. यशस्वी जैसवाल हिंदुस्थानचा सर्वात तरुण खेळाडू (22 वर्षे 142 दिवस) असून कर्णधार रोहित शर्मा (37 वर्षे) सर्वात वयस्कर खेळाडू आहे. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानी संघातील तीन खेळाडू पस्तिशीतले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी संघ सरासरी 31 वर्षांचा अनुभवी संघ ठरला आहे.

हरूनही मुंबई इंडियन्स ठरले बाजीगर, हिंदुस्थानी संघात चौघांची वर्णी

मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा मोसम अत्यंत निराशाजनक ठरतोय. सलगच्या पराभवांनी संघाचे आयपीएलमधील आव्हान संपण्याच्या मार्गावर असले तरी या संघातील चार खेळाडूंनी हिंदुस्थानी संघात स्थान मिळवलेय. मुंबई इंडियन्सचाच रोहित शर्मा हिंदुस्थानचा कर्णधार आहे तर हार्दिक पंडय़ा उपकर्णधार. म्हणजे हरूनही मुंबई इंडियन्स बाजीगर ठरले आहे.

आयपीएलमध्ये दमदार आणि जोरदार कामगिरी करणाऱया संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग यांची 15 सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे. पण आयपीएल संघाचा विचार केल्यास मुंबई इंडियन्सने सर्व संघांमध्ये बाजी मारलीय. शर्मा, पंडय़ासह जसप्रीत बुमरा आणि सूर्यकुमार यादव हे चौघे संघात निवडले गेले आहेत. तसेच दिल्लीच्या ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवलाही संघात स्थान मिळाले असून त्यांचा खलील अहमद राखीव खेळाडूंमध्ये आहे. दिल्लीपाठोपाठ सुपर फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसन, युझवेंद्र चहल आणि यशस्वी जैसवालने छप्पर फाडके कामगिरी करत हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्याची किमया केली आहे. चेन्नईच्या शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजाने तर बंगळुरूच्या विराट कोहली, मोहम्मद सिराजने वर्ल्ड कपचे तिकीट मिळवले आहे. पंजाबकडून अर्शदीप सिंग या एकमेव खेळाडूला वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आले आहे. मात्र हैदराबाद, लखनऊ या संघांच्या एकाही खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही.

हिंदुस्थानचे दहा खेळाडू अनुभवी

2022 साली दुबईत झालेल्या वर्ल्ड कपचे नेतृत्व रोहित शर्माकडेच होते. यंदाही तोच कर्णधार असून त्या संघातील दहा खेळाडूंची पुन्हा निवड करण्यात आली आहे. त्यात रोहितसह विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल यांचा समावेश आहे. गेल्या वर्ल्ड कपसाठी जसप्रीत बुमराचीही निवड करण्यात आली होती, मात्र ऐनवेळी दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती. तो यंदाही संघात आहे. मात्र यशस्वी जैसवाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे हे पाच खेळाडू आपला पहिलाच वर्ल्ड कप खेळणार असून रवींद्र जाडेजाने तीन वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कप संघात पुनरागमन केले आहे.

हिंदुस्थानचा टी-20 वर्ल्ड कप संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंडय़ा, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.