पूर्वपुण्याई की फॉर्मला मिळणार न्याय; हिंदुस्थानच्या टी-20 वर्ल्ड कप संघाच्या निवडीची आज शक्यता

आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानचा संघ आज निवडला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या उमेदवारीप्रमाणे हिंदुस्थानच्या 15 सदस्यीय संघात कुणाला अमेरिकेचे तिकीट मिळेल, याचा अचूक अंदाज बांधणे आता सोप्पे राहिले नाही. आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी वर्ल्ड कप ट्रायल असलेल्या आयपीएलमधील हिंदुस्थानी खेळाडूंची कामगिरी आता सर्वांसमोर आहे. त्यामुळे संघनिवड करताना आयपीएलच्या फॉर्मला न्याय मिळतो की पुन्हा पूर्वपुण्याईच चालते, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी हिंदुस्थानी संघाचे 10 खेळाडू जवळजवळ निश्चित मानले जात होते. मात्र आयपीएलमधील जोरदार कामगिरीनंतर हिंदुस्थानी संघ बदलाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे 15 सदस्यीय संघ निवडण्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. या क्षणाला कुणाला वगळायचे आणि कुणाला संधी द्यायची, याबाबत निर्णय घेणे अवघड होऊन बसले आहे.
सलामीवीरांचा सावळा गोंधळ

सध्या सुपर फॉर्मात असलेल्या विराट कोहलीशिवाय हिंदुस्थानचा संघ अशक्य आहे. त्याला सलामीवीर की तिसऱया स्थानासाठी निवडणार हे नंतर कळेलच, पण सलामीवीर म्हणून यशस्वी जैसवाल, शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाडपैकी कुणाला निवडायचे हे ठरवणे कठीण झाले आहे. आयपीएलची कामगिरी पाहाता गायकवाडला संधी द्यायला हवी, पण यशस्वी जैसवालची बॅटही तळपू लागली आहे. या दोघांच्या लढाईत शुबमन गिलसारख्या फलंदाजाला वगळण्याचे धाडस करावे लागणार आहे. त्यामुळे निवड समितीचा अंतिम निर्णय काय असेल, हे उद्याच कळेल.

यष्टिरक्षणासाठी दोघांची निवड अपेक्षित

हिंदुस्थानी संघात यष्टिरक्षणासाठी चार-चार खेळाडू शर्यतीत आहे. खरं सांगायचे तर ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झालीय. कार अपघातातून बरा झालेला ऋषभ पंत सर्वांची पहिली पसंत असली तरी राजस्थानच्या नेतृत्वासह दमदार फलंदाजी आणि यष्टिरक्षण करणाऱया संजू सॅमसनला डावलणे कठीण आहे. त्यातच के. एल. राहुल आणि दिनेश कार्तिकचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे निवड समिती दोन यष्टिरक्षकांची निवड करू शकते आणि फलंदाज म्हणून राहुललाही संघात ठेवू शकते.

बुमराच्या साथीला नवे जोडीदार

मोहम्मद सिराज हा जसप्रीत बुमराचा जोडीदार मानला जात होता, पण आयपीएलमधील त्याची कामगिरी अत्यंत खालावलेली आहे. त्यामुळे त्याची निवड कठीण दिसतेय, पण तो पूर्वपुण्याईवर संघात आला तर नव्या दमाचा एक जोडीदार कमी होऊ शकतो. मात्र आयपीएलच्या कामगिरीवर वेगवान गोलंदाजांची निवड करण्याचा विचार केल्यास अर्शदीप सिंग, हर्षित राणा, टी. नटराजन आणि संदीप शर्मापैकी दोघांची निवड बंधनकारक आहे.

कुलदीपच्या साथीला युझवेंद्र

फिरकीवीर म्हणून युझवेंद्र चहलची कामगिरी सर्वात लक्षवेधी ठरलीय. कुलदीपच्या साथीला दुसरा फिरकीवीर म्हणून युझवेंद्र चहलची निवड करण्याचा निर्णय निवड समितीसाठी खूप धोकादायक ठरू शकतो. पॅरेबियन खेळपट्टीवर दोन फिरकीवीर घेऊन जाण्याचा निर्णय मूर्खपणाचा ठरू शकतो. त्यामुळे चहलवर पुन्हा एकदा अन्याय होण्याची शक्यता आहे.

पंडय़ाचा पत्ता कापण्याची शक्यता

सूर्यकुमार यादवचे स्थान पक्के असले तरी शिवम दुबे, रिंकू सिंग आणि रियान परागपैकी कुणाची लॉटरी लागते, हे सांगणे आताही कठीणच आहे. त्यातच हार्दिक पंडय़ाचा अष्टपैलू म्हणून खराब फॉर्म चव्हाटय़ावर आल्यामुळे त्याला वगळले तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही. मात्र त्याच्या जागी कुणाची वर्णी लागेल, हे निश्चित सांगता येत नाही.

राखीव खेळाडूंच्या निवडीची शक्यता

हिंदुस्थानचा 15 सदस्यीय संघ निवडल्यानंतर वाद होण्याची दाट शक्यता आहे. ंिहंदुस्थानी संघातील सहा खेळाडू निश्चित आहेत आणि उर्वरित 9 जागांसाठी किमान 20 दावेदार आहेत. त्यामुळे त्या 20 पैकी 9 खेळाडूंची निवड समितीचे केलेली निवड अनेकांना पटणारही नाही. त्यामुळे निवड समिती काही खेळाडूंना राखीव खेळाडूंमध्ये संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

…तर आयपीएलच्या कामगिरीला शून्य किंमत

आयपीएल ही जागतिक दर्जाची स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी आयपीएलमध्ये जोरदार कामगिरी करणाऱया खेळाडूंना संधी मिळणे क्रमप्राप्त आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, रियान पराग, शिवम दुबे यांनी फलंदाजीत भन्नाट कामगिरी केलीय तर युझवेंद्र चहल, टी.नटराजन, हर्षित राणा, हर्षल पटेल, संदीप शर्मा, मयंक यादव यांच्या कामगिरीने गोलंदाजीत मोठे बदलाची शक्यता निर्माण केली आहे. आयपीएलची कामगिरी पाहता यांच्यापैकी निम्मे खेळाडू संघात अपेक्षित आहेत. मात्र यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱया खेळाडूंचीच निवड झाली तर समजा निवड समितीच्या लेखी आयपीएलची कामगिरी शून्य आहे. नाव मोठे असलेल्या खेळाडूंना स्थान देण्यासाठी काही खेळाडूंवर यंदाही अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण यावेळी अन्याय होणाऱया खेळाडूंची संख्या असावी, अशी अपेक्षा आहे.

हिंदुस्थानचा टी-20 वर्ल्ड कप संभाव्य संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल/ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन/के. एल. राहुल, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, शिवम दुबे /हार्दिक पंडय़ा, रियान पराग/रिंकू शर्मा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग, टी. नटराजन /आवेश खान, युझवेंद्र चहल.