अश्रूंची झाली फुले! दक्षिण आफ्रिकेच्या डोळय़ांत आनंदाश्रू तर अफगाणिस्तानचे स्वप्न भंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 वर्ल्ड कपचा थरार अनुभवण्यासाठी साऱयांच्याच नजरा पहिल्या उपांत्य सामन्याकडे लागल्या होत्या, पण अफगाणिस्तानने अपेक्षाभंग केले. गेली 32 वर्षे दक्षिण आफ्रिका ज्या क्षणासाठी संघर्ष करत होता ते अखेर पूर्ण झाले. आजवर उपांत्य फेरीतच मान टाकणाऱया दक्षिण आफ्रिकेने आपल्या कपाळावर असलेला ‘चोकर्स’चा शिक्का पुसून काढताना आपल्या क्रिकेट कारकीर्दीत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारण्याचा इतिहास रचला. 32 वर्षांनंतर मिळवलेल्या यशानंतर दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या अश्रूंची अक्षरशः फुले झाली तर प्रथमच उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम करणाऱया अफगाणिस्तानच्या डोळ्यांत स्वप्नभंगाचे दुःख होते. दक्षिण आफ्रिकेने आपल्या विजयांची नॉनस्टॉप मालिका कायम राखताना सलग आठवा विश्वविक्रमी विजय मिळवला.

टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या उपांत्य सामन्याने घोर निराशा केली. जो खेळ अफगाणिस्तान गेल्या सात सामन्यांत केला होता, उपांत्य फेरीत धडक मारून इतिहास रचल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण आज ते अपेक्षांच्या ओझ्याखाली अक्षरशः दबले. या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणारे त्यांचे स्टार दक्षिण आफ्रिकन माऱयापुढे धारातीर्थी पडले. त्यांचा एकही फलंदाज त्यांना भिडला नाही, त्यांना नडला नाही. खेळाडूंचे अपयश पाहून अफगाणिस्तान क्रिकेट धाय मोकलून रडला. अवघ्या 56 धावांत खुर्दा पाडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक विजयी लक्ष्य 65 चेंडू आधीच गाठले. आता आफ्रिकन संघ आपल्या क्रिकेट कारकीर्दीतल्या पहिल्या अंतिम सामन्यात शनिवारी खेळेल.

यानसन–रबाडाने खड्डा खणला

अफगाणिस्तानच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारी रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झदरान ही सलामीची जोडी पहिल्याच षटकात फुटली. जणू अफगाणिस्तानी संघाचे धरणच फुटले असावी. त्या धरणाच्या पाण्यात अवघा अफगाणिस्तानी संघ वाहून गेला. माकाx यानसनने सामन्याच्या सहाव्या चेंडूवरच गुरबाजला शून्यावर केले. हा धक्का अफगाणिस्तानला झेपलाच नाही. मग पुढच्या षटकात त्याने गुलबदीन नईबचा त्रिफळा उडवला. मग पॅगिसो रबाडाने आपल्या डावातील पहिल्याच चेंडूवर झदरानचा त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि चौथ्या चेंडूवर मोहम्मद नबीची विकेट उडवत  अफगाणींची विकेटच काढली. मग यानसनने आपल्या तिसऱया षटकात नांगेयालिया खरोटेलाही बाद करत अफगाणिस्तानची 5 बाद 23 दुर्दशा केली. यानंतरही अफगाणिस्तानच्या डावाला कुणीच आधार देऊ शकला नाही. पुढे अॅनरिक नॉर्किया आणि तबरेस शम्सीने 33 धावांत उर्वरित अर्धा संघ गुंडाळत या झुंजार संघाचा डाव 56 धावांतच संपवला. यानसन आणि शम्सीने प्रत्येकी तीन तर रबाडा आणि नॉर्कियाने दोन-दोन विकेट टिपल्या.

आरामात आफ्रिकेने केले काम तमाम

गेल्या काही सामन्यांत घणाघाती फलंदाजी करणारा क्विंटन डिकॉकला फझलहक फारुकीने त्रिफळाचीत केल्यावर अफगाणिस्तानी खेळाडूंचे मनोधैर्य काहीसे उंचावले होते. पण रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्करम यांनी अफगाणी गोलंदाजांचे खच्चीकरण करणारी खेळी करत 55 धावांची अभेद्य भागी रचत दक्षिण आफ्रिकेच्या ऐतिहासिक यशावर शिक्कामोर्तब केले. अफगाणच्या फारुकी, नवीन, कर्णधार राशीद खानने संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण अफगाणिस्तानने सामना फलंदाजीतच गमावला होता. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना काही अर्थही उरला नव्हता.

सात अपयशानंतर आठव्यात यशस्वी

दक्षिण आफ्रिकेचा संघ 1992 च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये दुर्दैवीरीत्या उपांत्य फेरीत हरला होता. त्यानंतर त्यांनी चार वेळा (1999, 2007, 2015 आणि 2023) उपांत्य फेरी गाठली, पण ते एकदाही यशस्वी झाले नाही. असेच काहीसे अपयश टी-20 वर्ल्ड कपमध्येही पदरी पडले. 2009 आणि 2014 च्या स्पर्धेतही ते उपांत्य फेरीत पोहोचले होते, पण तेथेही ते आपल्यावर असलेला ‘चोकर्स’चा शिक्का पुसू शकले नव्हते. मात्र यंदा आठव्या प्रयत्नांत त्यांनी सलग आठव्या विजयासह आपला नवा इतिहास रचला.

ही तर आमची सुरुवात ः राशीद खान

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव झाल्याने निराश झालो, मात्र आमच्या अफगाणिस्तान संघाची ही तर सुरुवात आहे. कुठल्याही संघाला हरवू शकतो, हा आत्मविश्वास नक्कीच या वर्ल्ड कपमध्ये मिळाला, अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खानने दिली. वर्ल्ड कपमधील अभियान संपुष्टात आल्यानंतर राशीद खान बोलत होता. तो पुढे म्हणाला, वर्ल्ड कपमधील आमची कामगिरी स्वप्नवत ठरली, मात्र उपांत्य लढत आमच्यासाठी एक संघ म्हणून अतिशय कठीण ठरली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आम्ही लढण्याइतक्याही धावा करू शकलो नाही. नाणेफेक जिंकली, पण परिस्थितीने आम्हाला साथ दिली नाही. मात्र या क्रिकेटच्या मोठय़ा व्यासपीठावर आम्हाला भरपूर काही शिकायला मिळाले. आमच्या खेळाडूंमध्ये काwशल्य आहे, हे आता सर्वजण मान्य करतील. वर्ल्ड कपमधील बहुतांश सामने आम्ही गोलंदाजीच्या जिवावर जिंकले, मात्र फलंदाजीमध्ये आम्हाला आणखी सुधारणा करण्याची गरज आहे, असेही राशीद खानने सांगितले.

अब डरना मना है ः एडन मार्करम

वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच फायनल गाठली असली तरी फायनलमध्ये आता ‘डरना मना है’ असा सल्ला मी संघसहकाऱयांना दिला आहे, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने विजयानंतर दिली. उपांत्य लढतीत अफगाणिस्तानवर सहज विजय मिळविल्यानंतर मार्करम बोलत होता. तो म्हणाला, वर्ल्ड कपमध्ये आम्ही प्रथमच फायनल खेळणार आहे, मात्र घाबरण्याचे काही कारण नाही. आमच्या संघात अनेक जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू आहेत, मात्र मोक्याच्या वेळी सर्वांनी मिळून सांघिक कामगिरी करणे महत्त्वाचे असते. अफगाणिस्तानविरुद्ध आमच्या गोलंदाजांनी इतकी भन्नाट गोलंदाजी केली की, त्यांचे काwतुक करावे तेवढे कमीच होय. कारण या खेळपट्टीवर फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. अफगाणिस्तानला 56 धावांत गुंडाळल्यामुळे अर्धी लढाई आम्ही तेथेच जिंकली होती. आमच्या गोलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली आहे. आता अंतिम लढतीची प्रतीक्षा आहे, असेही मार्करमने सांगितले.