सॉल्टच्या झंझावातामुळे विंडीजच्या विजयाला हॉल्ट

साखळीत विशेष काही करू न शकलेल्या इंग्लंडने सुपर एटच्या पहिल्याच साखळी सामन्यात धमाका करत यजमान वेस्ट इंडीजला हादरवले. फिल सॉल्टच्या झंझावाती 87 धावांच्या खेळीने वेस्ट इंडीजच्या सलग चार सामन्यांच्या नॉनस्टॉप विजयाच्या मालिकेला हॉल्ट लावला. इंग्लंडने विंडीजचे 181 धावांचे जबरदस्त आव्हान 15 चेंडू आधीच गाठले आणि उपांत्य फेरीच्या दिशेने आपली सुसाट पावले टाकायला सुरुवात केली.

वेस्ट इंडीजच्या 181 धावांचा पाठलाग करताना इंग्लिश संघ अक्षरशः पेटून उठल्यासारखा खेळला. साखळी सामन्यात त्यांना विशेष काही करता आले नव्हते, मात्र आज त्यांनी फटकेबाजीचा पुरेपूर आनंद उपभोगला. फिल सॉल्टने जोस बटलरसह 67 धावांची भागी रचत दणदणीत सलामी दिली. मात्र बटलरपाठोपाठ मोईन अली लवकर बाद झाल्याने विंडीज डोके वर काढेल, असे वाटत होते. पण सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टॉने अशी वादळी 97 धावांची भागी रचली की इंग्लंडने 18 व्या षटकांतच विजयावर शिक्कामोर्तब केले. सॉल्टने 5 षटकार आणि 7 चौकारांची आतषबाजी करत नाबाद 87 धावा केल्या. हे इंग्लंडचे स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठरले. बेअरस्टॉने 26 चेंडूंत 48 धावा पह्डून काढत संघाला जोरदार विजय मिळवून दिला.