
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी आजपासून खुला करण्यात आला आहे. तब्बल 6 महिन्यानंतर ताडोबा पर्यटकांसाठी खुले झाले असून 18 मार्चपासून ताडोबा कोरोना संसर्गाच्या भीतीमूळे बंद होते. मात्र कोविडचा शिरकाव रोखण्यासाठी व्यवस्थापनाने काही अटी-शर्ती पर्यटकांसाठी बंधनकारक केल्या आहेत. ज्यामध्ये एका जिप्सीमध्ये आता 6 ऐवजी 4 पर्यटक बसवणे, गरोदर महिला, 10 वर्षाखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना पर्यटनासाठी बंदी आणि मास्क, sanitizer, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक करणे आदींचा समावेश करण्यात आला आहे.
एखाद्या पर्यटकाला कोविडसदृश्य लक्षणं आढळल्यास प्रवेश नाकारला जाणार आहे. या हंगामापासून ताडोबाच्या नोंदणीसाठी नवी वेबसाईट देखील कार्यान्वित झाली असून, आता mytadoba.org या साईटवर ताडोबा प्रवेश बुकिंग करता येणार आहे. दरम्यान, आज पर्यटनाचा प्रारंभ करताना क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी प्रवेशद्वारावर पूजा केली. आणि पर्यटनासाठी द्वार खुले केले. पहिल्याच दिवशी पर्यटकांचा प्रतिसाद दिसून आला. मरगळ आलेल्या मोहर्ली या गावात आज चैतन्य दिसले.
याच गावात ताडोबाचे प्रवेशद्वार असल्याने इथेच हॉटेल, रिसॉर्ट, छोटे-मोठे व्यवसाय, चहाटपऱ्या आहेत. यातून गावाला अर्थार्जन होते. गेल्या सहा महिन्यांपासून हे अर्थचक्र थांबले होते. पण आता ते नव्याने सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.




























































