विजय मल्ल्याची ऑफर, माझे पैसे घ्या पण ‘जेट’ला वाचवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचविण्यासाठी ऑफर दिली आहे. सरकारी बँकांनी माझे पैसे परत घ्यावेत आणि संकटांशी सामना करणार्‍या जेट एअरवेजला वाचवावे, असे ट्विट मल्ल्याने केले आहे. जेटचे चेअरमन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने संचालक मंडळाचा राजीनामा दिल्यानंतर मल्ल्याने हे ट्विट केले आहे.

विजय मल्ल्याने एकामागून एक अनेक ट्विट केले आहेत. काही ट्विटमध्ये त्याने सरकारवर टीकादेखील केली आहे. जेट एअरवेजला मदत केली जात आहे, त्याचप्रमाणे किंगफिशरलाही मदत करायला हवी होती. सरकारचे धोरण दुटप्पी आहे, असे मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजप सरकारने किंगफिशरला वाचविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. आता तेच भाजप सरकार नरेश गोयल यांच्या पाठीशी उभे राहिल्याची टीकाही मल्ल्याने केली आहे. जेटच्या कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या वाचाव्यात तसेच ही सेवा आणि संस्था सुरक्षित राहावी, यासाठी सरकारी बँका जेटला बेल आऊट पॅकेज देत असल्याबद्दल मल्ल्याने एका ट्विटमध्ये आनंद व्यक्त केला, पण हेच पाऊल किंगफिशरला वाचवायलाही उचलायला हवे होते, असे ट्विटही मल्ल्याने केले आहे.

बँका माझा पैसा का घेत नाहीत?

बँका माझा पैसा का घेत नाही, असा सवाल मल्ल्याने उपस्थित केला आहे. मल्ल्या याने आपली मालमत्ता कर्नाटक हायकोर्टात सादर केल्याचे ट्विटद्वारे सांगितले आहे. सरकारी बँका आणि अन्य कर्ज पुरवठादारांना ही रक्कम देता यावी यासाठी आपण असे केल्याचे सांगत, बँका माझा पैसा का घेत नाहीत, असा सवालही उपस्थित केला आहे.

‘जेट’ का रुतले!

26 वर्षे जुन्या जेट एअरवेजला दुसर्‍यांदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आता तर जेटचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांना जेटच्या संचालक मंडळाचा राजीनामा द्यावा लागला. यापूर्वी 2013 मध्ये जेटला अबू धाबीतील एतिहाद एअरवेजला 24 टक्के शेअर्स विकावे लागले होते.

  • जेटने स्वस्तात विमान तिकीट देण्याची योजना सुरू केली, पण त्यामुळे जेटला नफा झाला नाही. किंगफिशर एअरलाईन्स बंद झाल्याचाही जेट फायदा घेऊ शकली नाही. इंडिगोने या संधीचा फायदा उठविला. घरगुती स्पर्धेतून जेटने दहा वर्षांत विमानांची संख्या 81 वरून 119 केली.
  • गेल्या वर्षी ब्रेंट क्रूडची किंमत वाढल्यामुळे जेटचा हवाई इंधन खर्चात वाढ होऊन तो 6 हजार25 कोटींवर पोहोचला. 2017 मध्ये हा खर्च 5 हजार 935.93 कोटी एवढा होता.
  • 2018 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली. त्यामुळे जेटचा विदेशी चलन खर्चही वाढला. इंधन खरेदीसाठी आणि अन्य खर्च भागविण्यासाठी जेटला डॉलरमध्ये पेमेंट करावे लागले.
  • 31 डिसेंबर 2012 मध्ये जेटवर 11 हजार 200 कोटींचे कर्ज होते. मे 2013 मध्ये 2 हजार 58 कोटी रुपयांमध्ये एतिहादला 24 टक्के शेअर्स विकण्यात आले. यामुळे जेटवरील कर्जाचा डोंगर काही प्रमाणात कमी झाला.

 

jet-in-profit