
गर्दीचा फायदा घेऊन परदेशी महिलेची पर्स चोरणाऱ्या शंकर उफाडे, दामिनी शहा आणि सुनीता राय या तिघांना मालाड पोलिसांनी अटक केली. तर एक महिला फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. अटकेत असलेले ते तिघे एकमेकांचे नातेवाईक आहेत.
अमेरिका येथे राहणारी महिला ही सुट्टीनिमित्त गेल्या महिन्यात मुंबईत आली होती. ती मालाड येथे तिच्या नातेवाईकांकडे गेली होती. दुपारी त्या मालाड येथील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांना पर्स नसल्याचे लक्षात आले. पर्स चोरीप्रकरणी महिलेने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक रवी अडाणे याच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सचिन कापसे आणि पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये दामिनी आणि फरार महिला दिसली. पोलिसांनी विरार येथून दामिनीला अटक केली. तिच्या चौकशीत शंकर आणि सुनीताचे नाव समोर आले. दामिनी आणि फरार महिला या मायलेकी आहेत, तर सुनीता आणि शंकर हे भावंड आहेत. कसून चौकशी केल्यावर त्या तिघांनी चोरीची कबुली दिली. अटक केलेले ते तिघेही सराईत आरोपी असून त्यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत. तर फरार आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.





























































