हिंदुस्थानी कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार; ‘रेडिओ सिटी फ्रीडम’कडून विविध उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगीत क्षेत्रातील हिंदुस्थानी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रेडिओ सिटीने `रेडिओ सिटी फ्रीडम’ हे व्यासपीठ निर्माण केले आहे. या उपक्रमामुळे संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकार आणि उदयोन्मुख कलाकार यांना रेडिओ सिटी या रेडिओ वाहिनीच्या माध्यमाद्वारे आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. ‘रेडिओ सिटी फ्रीडम’ या उपक्रमामध्ये पुढील कार्यक्रमांचा समावेश होतो.

‘आर्टिस्ट ऑफ द मंथ’ मध्ये ज्या कलाकाराने हिंदुस्थानी संगीतावर आपला ठसा उमटवला आहे, अशा एका कलाकार किंवा बँडचा सांगीतिक प्रवास उलगडला जातो. कलाकाराची प्रेरणा, त्याचा प्रवास, त्याच्या सांगीतिक प्रवासातील चढ-उतार याविषयी विस्तृत चर्चा या कार्यक्रमात होते.  आनंद भास्कर, लेस्ली लुईस, आभा हंजुरा आणि ब्लडीवुड बँड यांसारख्या कलाकारांनी आपला सांगीतिक प्रवास या कार्यक्रमात उलगडला आहे.

एखाद्या कलाकाराला रेकॉर्डिंग स्टुडिओमधून आपली कला सादर करता यावी, यासाठी फ्रॉम माय स्टुडियो या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कलाकार ज्या स्टुडिओमध्ये असतील तिथे रेडिओ सिटीचे निवेदक जातात. त्या ठिकाणाचा फेरफटका मारतात आणि कलाकारांचे स्टुडिओ, आवडते वाद्य याविषयी गप्पा मारतात. ‘स्टोरी ऑफ अ सॉंग’ या कार्यक्रमात अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या गाण्यांचा समावेश असतो. या मुलाखतवजा कार्यक्रमात मजेदार किस्से, नुकत्याच रिलिज झालेल्या गाण्यासंदर्भातील माहिती दिलखुलासपणे सांगितली जाते. या कार्यक्रमांतर्गत मयूर साखरे, ईशान निगम आणि अभंग रिपोस्ट या बँडच्या कलाकारांच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सध्या हिप-हॉप संस्कृती वाढत आहे. हिंदुस्थानच्या विविध भाषा आणि प्रदेशांमधील तळागाळातील कलाकारांसोबत ‘हिप हॉप 91’  या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला जातो. कलाकारांना त्यांचा संगीत प्रवास शेअर करण्यासाठी आणि श्रोत्यांमध्ये विविध शैलींमधील उच्च दर्जाच्या संगीताचे प्रबोधन करण्यासाठी हे व्यासपीठ रेडिओ सिटीने निर्माण केले आहे.

रेडिओ सिटी फ्रीडम लाँच करण्यामागील कल्पना म्हणजे स्वतंत्र संगीतकारांकडे लक्ष वेधून घेणे आणि प्रेक्षकांना कलाकारांसमोर आणणे. हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील  घडामोडी, कलाकारांची माहिती, टूरिंग आर्टिस्ट, त्यांची कामगिरी इत्यादींचा रेडिओ सिटी फ्रीडममध्ये समावेश होतो, अशी माहिती रेडिओ सिटी डिजिटल मीडियाच्या सीओओ रचना कंवर यांनी दिली.