टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या स्वारीवर रवाना! पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने मोहिमेला प्रारंभ करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या स्वारीसाठी बुधवारी रात्री उशिरा ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. ‘बीसीसीआय’ने गुरुवारी सकाळी आपल्या ट्विटर हॅण्डलवर ‘टीम इंडिया’चा फोटो शेअर करून संघाला शुभेच्छा दिल्या. ‘बीसीसीआय’ने ‘लेट्स डू इट टीम इंडिया!’ अशा शब्दांत रोहितच्या सेनेला शुभेच्छा दिल्या आहेत. 28 दिवस रंगणाऱया या क्रिकेटच्या महाकुंभात हिंदुस्थानी संघ 23 ऑक्टोबरला कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने आपल्या मोहिमेला प्रारंभ करणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. त्याआधी ‘टीम इंडिया’ ऑस्ट्रेलियात चार सराव सामने खेळणार आहे. त्यांतील दोन सराव सामने हे अधिकृत असून दोन सामने हे ‘बीसीसीआय’कडून आयोजित करण्यात आले आहेत. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात अधिक सराव मिळावा व क्रिकेटपटूंना तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ‘बीसीसीआय’ने आठवडाभर आधीच आपल्या संघाला ऑस्ट्रेलियात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘टीम इंडिया’ने नुकतेच दक्षिण आफ्रिकेला तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-1 फरकाने हरवले, तर त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिकाही 2-1 फरकाने जिंकलेली आहे. हिंदुस्थानने घरच्या मैदानावर या दोन्ही मालिका जिंकल्या असल्या तरी गोलंदाजीत आपण मार खाल्लेला आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपला प्रारंभ होण्यापूर्वी हिंदुस्थानी गोलंदाजांना कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.