
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील घटनेसारखीच भयंकर घटना माणगावमध्ये घडली. विलेपार्ले येथून उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला आजीकडे आलेल्या एका 15 वर्षीय मुलीची ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकऱ्याने तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. तिचे नाव निधी उतेकर असे असून या घटनेमुळे माणगाव तालुका हादरून गेला आहे.
विलेपार्ले येथे राहणारी व सेंट झेवियर्स शाळेत नववीत शिकणारी 15 वर्षीय निधी उतेकर ही आई-वडील व भावासोबत माणगाव येथील पळसगाव ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या घरोशीवाडी येथे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आली होती. सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास वडिलांच्या मोबाईलवर बोलत ती घराबाहेर पडली. त्यानंतर ती परतलीच नाही. तिचा सतत शोध सुरू होता. आज दुपारच्या सुमारास तिचा मृतदेह जंगलात सापडला.
सखोल तपास
नसरापूर येथे हत्या झालेली चिमुकली पुण्याहून तिच्या आजीकडे आली होती. त्याचप्रमाणे निधीही सुट्ट्यांसाठी माणगावात तिच्या आजीकडे आली होती. तिच्या मृतदेहावरील जखमा पाहून तिची हत्याच झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तिचा मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्याच्या अहवालानंतरच अधिक माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.




























































