तेलंगणात भाजपचे ‘शिंदे मॉडेल’, मुख्यमंत्र्यांच्या मुलीलाच फितवण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि टीआरएसचे आमदार के. कविता यांनी शुक्रवारी मोठा दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. मला भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु मी नकार दिला. असे मुख्यमंत्र्यांच्या मुलीने सांगितले. यावेळी त्यांनी निजामाबादचे भाजपचे लोकसभा सदस्य धर्मपुरी अरविंद यांच्यावर निशाणा साधला. यासोबतच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन केल्याचा त्यांचा दावाही कविता यांनी फेटाळला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कविता यांनी अरविंद यांचा पराभव केला होता. यावेळी भाजप नेते अरविंद यांच्यावर निशाणा साधत कविता म्हणाल्या की, भाजप नेत्यांनी खोटे बोलणे थांबवले नाही तर, जनता त्यांना धडा शिकवेल व त्याचे गंभीर परिणाम होतील. कविता म्हणाल्या की, आपल्या राजकीय कारकिर्दीत मी कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही, मी नेहमीच मुद्द्यांवर बोलले. यावेळी भाजप खासदाराने खोटा प्रचार थांबवला नाही तर निजामाबादमध्ये त्याला चप्पलने मारहाण केली जाईल. असा इशारा त्यांनी दिला.

भाजपने त्यांना पक्षात येण्यासाठी संपर्क साधला का? या प्रश्नाला उत्तर देताना कविता म्हणाल्या की, मी खूप सेटल लीडर आहे. मला या देशाच्या राजकारणात दीर्घकाळ राहायचे आहे. मी कोणाचेही नाव घेणार नाही. परंतु मला भाजपमधील काही मित्रांनी आणि त्यांच्या मित्र संघटनांनी पक्षात येण्यास सांगितले आणि त्या प्रस्तावित मॉडेलला ‘शिंदे मॉडेल’ असे नाव देण्यात आले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मिंधे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केली. त्यानंतर शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली आणि 30 जून रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सत्ताबदलालाच ‘शिंदे मॉडेल’ असे नाव दिले आहे. असे असले तरी तेलंगणातील लोक त्यांच्या पक्षाचा आणि नेत्यांचा विश्वासघात करत नाहीत. आम्ही मागच्या दाराने नव्हे तर आमच्या ताकदीवर नेते होऊ. मला भाजपकडून आलेली ऑफर मी स्पष्टपणे नाकारली आहे असे कविता म्हणाल्या.