“अरे त्या पुजाऱ्यांनी तयार केलेला नैवेद्य जर मला चालतो तर तो तुला का चालू नये ?”

>> निलकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

” श्री वासुदेव दत्त रूप श्रीगुरूंच्या शोधसी आले कुरवपुर क्षेत्रांसी, साक्षात श्रीगुरूंनी दर्शन दिले स्वामींना,

तया स्थानाचे माहात्म्य भक्तांना सांगितले श्रीवासुदेव स्वामींनी

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

 श्रीपादश्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात. कुरवपुर हे त्यांचे अक्षय निवासस्थान होय. ‘ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ‘ या मंत्राचा उच्चार होताक्षणी नजरेसमोर येते ते श्री क्षेत्र कुरवपुर. या मंत्राचा उगम ज्या ठिकाणी झाला तेच ते प्राचीन स्थान ही तपोभूमी मानली जाते.

दत्तभक्तांच्या वेद समजला जाणाऱ्या गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय ५ ते १० हे प्रथम दत्तावतार यांच्या विषयी आहेत. भगवान दत्तात्रेय यांनी सुमती व आपलराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथमावतार संपन्न केला, ते श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराज होय. वयाच्या सोळाव्या वर्षी माता – पित्यांचा निरोप घेऊन श्रीपादश्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. नंतर फिरत फिरत ते कुरवपुर येथे आले. तेथे बावीस वर्ष तपश्चर्या करून इथूनच ते अंतर्धान पावले.

श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे.

श्रीपादश्रीपावल्लभांच्या निवासाने आणि तपाने पावन झालेलं श्री क्षेत्र कुरवपुर त्याकाळी दुर्लक्षित अवस्थेत होतं. या आडवाटेच्या स्थानाची जागा २१ व्या चातुर्मासासाठी देवांच्या आज्ञेनुसार स्वामी महाराजांनी निवडली. तेथील पुजाऱ्यांचा आचार व्यवहार शास्त्रधर्मानुसार नसल्याने ते काही महाराजांच्या पसंतीस उतरेना. संन्यास धर्माला अनुसरून, विहीत आचारधर्म पाळणाऱ्या ठराविक कुटुंबाकडूनच भिक्षा स्वीकारण्याचा स्वामी महाराजांचा संकल्प असल्यामुळे त्यांनी कुरवपुरीच्या पुजाऱ्यांकडून भिक्षा स्वीकारणं बंद केलं. परंतु घडलं असं की साक्षात श्रीपादश्रीवल्लभांनी तरुण ब्रह्मचारीवेषात प्रत्यक्ष दर्शन देऊन महाराजांना आज्ञा दिली. अरे त्या पुजाऱ्यांनी तयार केलेला नैवेद्य जर मला चालतो तर तो तुला का चालू नये? ज्यांची आराधना करण्यास, साधना करण्यास स्वामी महाराज कुरवपुरला राहिले होते, त्यांचीच आज्ञा झाल्यामुळे दुसऱ्याच दिवसापासून स्वामी महाराजांनी पुजाऱ्यांकडून पुनश्च भिक्षा ग्रहणास सुरुवात केली. श्रेष्ठ दर्जाची सद्गुरू भक्ती कशी असते, याचा पाठच जणू स्वामी महाराजांनी या प्रसंगी घालून दिला. स्वामी महाराजांच्या वास्तव्याने श्रीक्षेत्र कुरवपूरची लोप पावत चाललेली महती पुन्हा एकदा लोकांसमोर आली.

 

आपली प्रतिक्रिया द्या