उत्तराखंडमधील गुरुद्वाऱ्यात तिसऱ्या दिवशीही तणाव; अटकेत असलेल्या निहंगांच्या सुटकेसाठी आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामधील नागरासू येथील गुरुद्वारात निर्माण झालेला तणाव सोमवारी तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. अटकेत असलेल्या चार निहंग शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी काही निहंगांनी गुरुद्वारातच ठाण मांडले असून, त्यांच्याकडे भाले आणि तलवारी असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना 16 जून रोजी कर्णप्रयाग येथे पार्किंगच्या वादातून झालेल्या संघर्षानंतर सुरू झाली. त्या प्रकरणात चार निहंगांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेची मागणी करत निहंगांनी गुरुद्वारात आंदोलन सुरू केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी गुरुद्वारातील लंगर व्यवस्थापनावरून झालेल्या वादानंतर निहंगांनी स्वतःला गुरुद्वारात कोंडून घेतले होते. सुरुवातीला दोन जणांना ओलीस ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र प्रशासन आणि निहंग यांच्यातील चर्चेनंतर दोघांचीही सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून हा प्रश्न संवादातून आणि शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याचे आवाहन केले. आवश्यक असल्यास पंजाब सरकारकडून सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच इंडो तिबेटियन बाॅर्डर पोलिस (आयटीबीपी) जवानांनाही तैनात करण्यात आले आहे.

नागरासू आणि कर्णप्रयाग या दोन्ही घटनांच्या तपासावर उत्तराखंडच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख ठेवण्यात आली आहे. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे. पोलीस महानिरीक्षक राजीव स्वरूप यांनी सांगितले की, नागरासू येथील वाद आणि कर्णप्रयागमधील संघर्ष या दोन स्वतंत्र घटना आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही घटनांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भारतीस सिख संघटनेचे अध्यक्ष साळविंदर सिंह कालसी यांनी सांगितले की, हा वाद गुरुद्वारातील निवास व्यवस्थेवरून सुरू झाला. हेमकुंड साहिब यात्रेसाठी आलेल्या निहंगांनी अधिक खोल्यांची मागणी केली होती. ती पूर्ण न झाल्याने वाद निर्माण झाला आणि त्यानंतर अटकेत असलेल्या सहकाऱ्यांच्या सुटकेची मागणी पुढे करण्यात आली. प्रशासन आणि निहंग यांच्यातील चर्चा सुरू असून, हा तणावपूर्ण प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.