कसोटीचा दीडशतक महोत्सव; एमसीजीवर ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात रंगणार कसोटी

तब्बल 147 वर्षांपूर्वी म्हणजे 15 ते 19 मार्च 1877 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना रंगला होता. आता या सामन्याला लवकरच दीडशतक पूर्ण होणार आहे आणि कसोटी क्रिकेटचे दीडशतक ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरच (एमसीजी) साजरे केले जाणार आहे. येत्या 15 ते 19 मार्च 2027 दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातच एकमेव कसोटी सामना खेळून हा कसोटी क्रिकेटचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरे केले जाणार आहे.

मूळ क्रिकेट असलेल्या कसोटीचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी एमसीजीने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटचा प्रत्येक महोत्सव एमसीजीवरच साजरा केला गेला आहे. पहिला कसोटी सामना खेळला गेल्यानंतर 1927 साली कसोटीचा सुवर्ण महोत्सव त्यानंतर 1977 साली कसोटीचा शतक महोत्सव ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याने आजवर साजरा केला गेला आहे. तीच परंपरा दीडशतक महोत्सवी सामन्यातही पाळली जाणार आहे.

पहिली कसोटी 45 धावांनी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने कसोटीचा शतक महोत्सवही 45 धावांनीच जिंकला होता. दीडशतक महोत्सवाचा जल्लोषही साजरा करण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक आहे. हा कसोटी सामना संस्मरणीय करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आतापासून कंबर कसली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या आगामी सात मोसमांसाठी आपला कार्यक्रम निश्चित करताना कसोटी, वन डे आणि टी-20 सामन्यांच्या आयोजन स्थळांना आताच अंतिम रूप दिले आहे.

बॉक्सिंग डेसारखी वातावरण निर्मिती

एमसीजीवर दरवर्षी 25 डिसेंबरला खेळविल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला जशी अभूतपूर्व गर्दी होते. तशीच वातावरण निर्मिती या दीडशतक महोत्सवी सामन्यासाठी केली जाणार आहे. या कसोटी सामन्याला हाऊसफुल्ल गर्दी लाभेल, असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आताच व्यक्त केला आहे. सुमारे 95 हजारांपेक्षा अधिक आसनक्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये पाच हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांची उभे राहण्याचीही सोय आहे. आजवरच या स्टेडियममध्ये 93 हजारांची अधिकृत उपस्थितीचा विक्रम 2015 च्या वन डे वर्ल्ड कप फायनलदरम्यान झाला होता. तो विक्रम या लढतीदरम्यान मोडला जाऊ शकतो.