
मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या अंमलबजावणीसाठी झालेल्या विलंबाने त्याचा खर्च 50 टक्क्यांनी वाढल्याची माहिती उघडकीस आली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-2 (एमयूटीपी) योजनेंतर्गत सुरू असलेल्या या प्रकल्पाचा खर्च 287 कोटींवरून 502 कोटींवर पोहचण्याची शक्यता आहे.
आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी माहितीच्या अधिकारातून मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून माहिती मागवली होती. हा प्रकल्प पूर्ण करण्यास विविध अडचणी आल्याने प्रकल्पाचा मूळ अंदाजित खर्च वाढत गेल्याचे उत्तर बोस यांना मिळाले आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 502.36 कोटींवर गेला असून त्यापैकी 464.73 कोटी रुपये खर्च झाले असल्याचे उत्तर महामंडळाने माहिती अधिकारातून दिले आहे. ठाणे ते दिवा हा 9.9 कि.मी.चा बांधताना खाडीतील कांदळवनामुळे मंजुरी मिळविण्यास झालेला उशीर तसेच प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यास विलंब झाल्याने प्रकल्पाची ‘डेडलाइन’ वारंवार पुढे ढकलली गेली. हा प्रकल्प मार्च 2019 रोजी पूर्ण होणार असल्याची डेडलाइनही आता पुढे ढकलली जाणार असल्याचे उघड झाले आहे. याआधी डिसेंबर 2017 ही या प्रकल्पाची डेडलाइन ठरविण्यात आली होती.
… तर 100 लोकल फेऱया वाढणार
मध्य रेल्वेचा पाचवा आणि सहावा मार्ग लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला ते ठाणे आणि दिवा ते कल्याणदरम्यान बांधून पूर्ण झाला आहे. केवळ ठाणे ते दिवा ही 8 ते 9 कि.मी.ची मार्गिका अपूर्ण राहिली असून ती पूर्ण झाल्यास लांबपल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होऊन मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील वाहतूककोंडी दूर होऊन आणखी 100 लोकल फेऱया चालविणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प रेंगाळल्याने जुलै 2016 मध्ये कॅगनेही ताशेरे ओढले होते.
उन्नत खाडी पुलास भरती-ओहोटीचा फटका
मुंब्रा खाडीमध्ये दीड किलोमीटर उन्नत पुलाचे काम करण्यासाठी खाडीतील भरती आणि ओहोटीचा अंदाज होऊन बांधकाम साहित्याचे ट्रक आतमध्ये न्यावे लागत असल्याने कामास उशीर लागत आहे.


























































