लाचखोरीत पुणे अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

ब्रिजमोहन पाटील । पुणे

शिक्षण, आरोग्य, उद्योग यांसह सर्वच क्षेत्रांत पुढे असलेले आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळख निर्माण होत असलेले पुणे लाचखोरीमध्येही राज्यात अव्वल आहे. गेल्या सहा महिन्यांत पुणे शहर आणि जिल्ह्यात ३५ शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे, तर पुणे विभागातही सर्वांत जास्त ८८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

सरकारी कार्यालयांत शासकीय कर्मचाऱ्यांना लाच दिल्याशिवाय ‘मी लाभार्थी’चा टेंभा नागरिकांना मिरवता येत नाही, हे सध्याचे वास्तव आहे. काम करायचे असले की अवघ्या २०० रुपयांपासून ते लाखो रुपयांची लाच घेतली जात आहे. अनेकदा सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही कामेच होत नसल्याने नागरिक लाचखोरीला वैतागले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्वरित तक्रार करता यावी, यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रत्येक कार्यालयात १०६४ हा टोल फ्री क्रमांक तसेच ९९३०९९९७७०० हा व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक लावला आहे. यावर नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्यामध्ये जास्त वेळ वाया न घालता त्वरित त्याची खातरजमा करून अवघ्या काही तासांमध्ये कारवाई करण्यावर भर दिला जात असल्याने लाचखोरांवर कारवाई लवकर होते, असा विश्वासही नगारिकांमध्ये निर्माण होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी २०१८ पासून ते ७ जून २०१८ या काळात राज्यभरात  ३९२ सापळे रचून ५४२ जणांना रंगेहाथ पकडले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कारवाईमध्ये वाढ झाली आहे. २०१७ मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये ३७० सापळ्यांमध्ये ४९६ जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले हाते. यंदाच्या वर्षी सर्वांत जास्त कारवाई पुणे विभागात झाली आहे. यामध्ये ८८ सापळे रचून लाच घेणाऱ्यांना पकडण्यात यश आले आहे. यातील पुणे जिल्ह्यात ३५, सोलापूर १९, कोल्हापूर १३, सातारा १२ आणि सांगलीतील १० सापळ्यांचा समावेश आहे. शासकीय अधिकारीही बदलीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील ‘क्रिम पोस्टिंग’ मिळविण्याचा खटाटोप करतात. त्यामुळेच पुणे विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईही इतर विभागांमध्ये सरस आहे. त्याखालोखाल नागपूर विभागात ५८ सापळे रचण्यात आले.

विभागनिहाय कारवाईवाई

विभाग               सापळे
पुणे                   ८८
नागपूर               ५८
अमरावती            ५४
संभाजीनगर          ४७
ठाणे                  ४५
नांदेड                ४१
नाशिक              ३८
मुंबई                 २१

एकूण              ३९२