
पोकळ आश्वासने आणि बोलघेवडय़ा घोषणा करून केंद्र आणि राज्यातील सरकार सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहे. प्रत्येक वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर नेऊन दोन्ही सरकारे सामान्यांच्या जीवाशी खेळत आहे. यांनी सर्वसामान्य जनतेचे रोजचे जगणेच मुश्कील केले आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे ‘होऊ द्या चर्चा’ अभियान राबविण्यात आले. यावेळी ठाकरे बोलत होत्या. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव अध्यक्षस्थानी होते.
ज्योती ठाकरे म्हणाल्या, पोकळ घोषणा आणि भावनिक राजकारण करून सत्तेवर आलेले हे सरकार नुसतेच इव्हेंट मॅनेजमेंट करत आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक व इंदू मिल येथे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले. मात्र, याबाबत आता हे सरकार ‘ब्र’ शब्द काढायला तयार नाही. शेतमालाला भाव नाही, खते-बियाणांची सर्वत्र वानवा आहे. ‘जीएसटी’च्या नावाखाली उद्योगधंदे मोडकळीस आले आहेत. त्यामुळे ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमातून सरकारच्या योजनांची पोलखोल करून सर्वसामान्य जनतेला जागे करण्याचे काम केले जात आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
मागच्या निवडणुकीत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख आले का? घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले का? पंतप्रधान मोदी यांनी मोठे मोठे इव्हेंट करून जाहीर केलेल्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या का? महागाई आटोक्यात आली का? आदी सवाल करीत जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सरकारची चमकोगिरी सर्वसामान्य नागरिकांसमोर उघड केली.
माजी आमदार सुजित मिणचेकर, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, बाजीराव्पाटील, स्वप्नील मगदूम, भरत देसाई, राजेंद्र पाटील, रघुनाथ नलवडे, मीना जाधव, विनायक विभूते, बाळासाहेब मुधाळे, पूनम पाटील, शिवाजी जाधव, अर्जुन मुरलीधर जाधव, अरुण गायकवाड, भरत मेथे आदी उपस्थित होते.

























































