WWE नंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार खली? ‘आप’कडून उमेदवारीच्या चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
khali-aap

रिंगमध्ये अनेक कुस्तीपटूंना चितपट करणाऱ्या WWE कुस्तीपटू खलीने गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी दिल्लीतील केजरीवाल सरकारने केलेल्या कामाचे खुलेपणाने कौतुक केले आहे, ज्यामुळे पंजाब निवडणुकीपूर्वी ते आम आदमी पक्षामध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आम आदमी पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून खली आणि केजरीवाल यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. पक्षाने फोटोसह ट्विट केले, ‘द ग्रेट खलीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. चॅम्पियन कुस्तीपटूने आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीतील शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक केले आणि पंजाबमध्येही त्याचीच पुनरावृत्ती होईल अशी आशा व्यक्त केली.’

आम आदमी पक्षाच्या ट्विटमुळे खली लवकरच आम आदमी पक्षात सामील होऊ शकतो या चर्चांना उधाण आलं आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत पक्ष खलीला उमेदवारी देऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी जागेचा शोध सुरू आहे. खरं तर, खलीचे पंजाबमध्ये जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे आणि आम आदमी पक्ष या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

केजरीवाल यांच्या भेटीत काय झाले यावर खलीच्या बाजूने अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. तसे, खलीने काही महिन्यांपूर्वी यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते समाजवादी पक्षात सहभागी होण्याची शक्यता स्थानिक माध्यमांमध्ये वर्तवली जात होती.