
दीर्घ काळ रखडलेला प्रकल्प म्हणून नोंद झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची ३१ मेची डेडलाईनही हवेत उडाली आणि कोकणी जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला. जून उजाडला तरी महामार्गाचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही महामार्ग खड्ड्यात हरवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर कोकणी जनता संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आहे. ‘गडकरीसाहेब, आश्वासन पाळल्याबद्दल आभार, आता नवीन तारीख सांगा…’ अशा उपहासात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटल्या आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे कोकण दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी महामार्ग रखडल्यामुळे मनाला खूप वेदना होत असल्याची भावना व्यक्त केली होती. त्याच वेळी त्यांनी ३१ मेची शेवटची डेडलाईन जाहीर केली होती. सालाबादप्रमाणे गडकरींचीही डेडलाईन हवेत विरल्याने कोकणी जनता संतप्त झाली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तब्बल १५ वर्षांपासून सुरू आहे. अनेक नामांकित कंपन्यांनी महामार्गाच्या कामाचा ठेका उचलला. मात्र १५ वर्षांनंतरही महामार्गाचे भिजत घोंगडे आहे. माणगाव, रोहा, नागोठणे, पेण, लांजा, संगमेश्वर अशा विविध भागांत महामार्गाचे काम बोंबलले आहे. विशेष म्हणजे जागोजागी मातीचे ढिगारे पडलेले असून वाहनचालकांना गाड्या चालवताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. त्यात अपघात होण्याची भीती असून वाहतूक कोंडीत वाहने तासन्तास अडकून पडत आहेत. पावसाळ्यात महामार्गावर चिखलाचे आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणी जनतेने गडकरींच्या ‘शेवटच्या डेडलाईन’चा चांगलाच समाचार घेतला आहे.
कामाची बोंब, मात्र टोलवसुलीतून लूट
महामार्गाच्या कामाची बोंब असताना चौपदरीकरण काँक्रिटीकरण पूर्ण
करण्याआधीच खारपाडा येथे पहिला टोल सुरू करण्यात आला. टोल वसुलीला कोकणी जनतेने कडाडून विरोध केला. त्यानंतर भाजप सरकारने टोलवसुलीची लुटालूट सुरूच ठेवली आहे. यावरून राष्ट्रीय महामार्ग विभागावर कोकणी जनता, वाहनचालक आणि प्रवासी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.



























































