‘भंडारदरा’चा पाणीसाठा 79 टक्क्यांवर पोहोचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. असे असले तरी डोंगर-दऱयांतून अजूनही पाणी येत असल्याने भंडारदरा धरणातील पाणीसाठा 79 टक्क्यांवर पोहोचला आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 82720 दलघफू झाला होता. दरम्यान, धरणातील मुबलक पाणीसाठा लक्षात घेता, प्रशासनाने साठा नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाऊस वाढल्यास पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

निळवंडे धरणातील पाणीसाठा 6214 (74.71) दलघफू झाला होता. या धरणातून प्रवरा नदीत 2300 क्यसेकने पाणी सोडण्यात येत होते. ते घटविण्यात येऊन 800 क्युसेक करण्यात आले. ओझर ओव्हरफ्लो झाल्याने 2997 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. भंडारदरा धरण परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. धरणाचा साठा गतवर्षी जास्त होता, तर गेल्या वर्षी कॅनॉल परिसरात दरमहिन्यात तीन ते चार वेळा पाऊस झाल्यामुळे शेतीसाठी आवर्तनाच्या पाण्याची आवश्यकता वाटली नाही. त्यामुळे धरणात पाणीसाठा शिल्लक राहिला. त्यामुळे गतवर्षी साठा जास्त दिसत आहे. तसेच या वर्षी साठा 2365दलघफू शिल्लक होता. धरण दरवर्षी भरते व या वर्षीही येत्या काही दिवसांत धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

भोजापूर तुडुंब, म्हाळुंगी नदीला पाणी

361 दलघफू क्षमतेचे भोजापूर धरण काल पहाटे ओव्हरफ्लो झाल्याने म्हाळुंगी नदीत सुमारे 540 क्युसेकने पाणीप्रवाह सुरू आहे. या नदीचे पाणी काल सायंकाळी सहा वाजता सिन्नर तालुक्यातील नळवाडी गावाच्या पुढे निघाले होते. ही नदी संगमनेर तालुक्यातून वाहते. ही नदी संगमनेरात प्रवरा नदीला मिसळते. या नदीकाठच्या संगमनेरातील जनतेने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.