पुण्यात भरदिवसा गोल्ड लोनच्या कार्यालयावर दरोडा, 1 कोटींचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे नगर रस्त्यावरील एका गोल्ड लोनच्या कार्यालयावर सोने तारण ठेवण्याच्या बहाण्याने बंदूकधारी चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना गुरुवारी सकाळी पावने अकराच्या सुमारास घडली. भरदिवसा हा प्रकार घडल्यामुळे व्यापार्‍यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून बंदूकीच्या धाकाने सोने लुटण्याची शहरातील ही दुसरी घटना आहे. चोरट्यांनी अंदाजे 1 कोटी पेक्षा अधिक किंमतीचा ऐवज चोरी करून पोबारा केला आहे. ही घटना आयएफएल या गोल्ड लोन देणार्‍या संस्थेत घडली आहे. माहिती मिळताच पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे.

gold-loan

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नगर रस्त्यावरील भाजी मार्केट परिसरातील आनंद इम्पायर इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरला कंपनीच्या गोल्ड लोनचे कार्यालय आहे. गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास एक व्यक्ती सोने तारण ठेवून गोल्ड लोन घेण्याच्या बहाण्याने कार्यालयात शिराला. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ दोन व्यक्ती आत आल्या. सकाळीच कार्यालय उघडून दुकानातील दोन महिला व एक पुरूष काम करत होते. त्यावेळी सोन्याच्या तिजोरी उघड्या होत्या. चोरट्यांनी कार्यालयातील एका कामगाराच्या डोक्याला बंदूक लावून तिजोरीतील सोन्या- चांदीचे दागिने बॅगेत भरण्यास सुरूवात केली. अवघ्या काही मिनिटात कोट्यवधी रूपयांचा ऐवज चोरी करून चोरट्यांनी पळ काढला. याप्रकरणी चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.