पोलिसांच्या सायरनमुळे 25 लाखांची रोकड वाचली, श्रीगोंद्यात स्टेट बँकेचे एटीएम फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावाच्या भरवस्तीत असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम तीन ते चार चोरट्यांनी फोडले. ते मशीन घेऊन जात असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या वाहनाचा सायरन वाजल्याने चोरट्यांनी एटीएम रस्त्यातच टाकून पळ काढला. या एटीएममध्ये अंदाजे 25 लाखांहून अधिक रोकड असल्याची माहिती मिळाली  आहे. याबाबत विश्वास पोपट कसबे यांनी फिर्याद दिली आहे.

लोणी व्यंकनाथ गावात चार-पाच चोरट्यांनी स्टेट बँकेचे एटीएम फोडून मशीन चोरी केले. मात्र, गस्तीवर असणाऱ्य़ा श्रीगोंदा पोलिसांच्या वाहनाचा सायरन वाजल्याने एटीएम मशीनमधील 25 लाख 99 हजारांची रोकड वाचली. दरम्यान, श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत एका संशयितास ताब्यात घेतले आहे. चोरट्यांनी एटीएम रूममधील, बाहेरील व स्टेट बँकेच्या बाहेरील असे तीन सीसीटीव्ही कॅमेरे चेरून नेले आहेत. याशिवाय एटीएम आणि एटीएमच्या रूमच्या दरवाजाची तोडफोड केली आहे. पोलीस उपअधीक्षक अण्णा जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.