
सामना प्रतिनिधी, मुंबई
विलेपार्ले येथे राहणाऱ्या वृद्ध डॉक्टरच्या घरी 8 लाख रुपयांची घरफोडी केल्याप्रकरणी दोघांना जुहू पोलिसांनी अटक केली. झहीर अब्दुल रहीम शेख ऊर्फ सोनू, झहीर इकबाल शेख अशी या दोघांनी नावे आहेत. ही टोळी दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळेस घरफोडय़ा करते तर तिसऱ्या आरोपीचा जुहू पोलीस शोध घेत आहेत.
तक्रारदार हे डॉक्टर आहेत. त्यांचा एक खासगी दवाखाना आहे. त्यांचा अमेरिकेत राहणारा मुलगा फेब्रुवारी महिन्यात राहण्याकरिता घरी आला होता. त्याने परदेशातून 10 हजार अमेरिकन डॉलर, दीड लाख हिंदुस्थानी चलन आणि एक हेडफोन आणला होता. मुलाने पैसे आणि हेडफोन घरातील कपाटात ठेवले होते.
फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घरी कोणी नसताना चोरट्यांनी घरफोडी करून आठ लाख रुपयांचा ऐवज चोरून पळ काढला होता. घरफोडीप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनराज डोंगरे आणि पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून रिक्षाचा नंबर मिळवला. तांत्रिक माहितीच्या आधारे त्या रिक्षाची माहिती काढली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून त्या दोघांना अटक केली. ही टोळी वृद्ध आणि घरात एकटे राहणाऱ्यांना टार्गेट करते. दिवसा रेकी केल्यावर रात्रीच्या वेळेस ते घरफोडी करतात अशी त्यांची गुन्हय़ाची पद्धत आहे. जुहू पोलिसांनी चोरीला गेलेला मुद्देमाल अद्याप जप्त केलेला नाही.

























































