
नगर शहरातील झेंडीगेट परिसरामध्ये असलेल्या बाबा बंगाली चौकातील अतिक्रमण दूर करण्यासाठी नगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर जमावाने दगडफेक केल्यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचाऱयाच्या डोक्याला मोठी दुखापत झाली असून, या प्रकरणासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेचे कर्मचारी दत्तात्रय केशव जाधव (वय 50) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सादीक बाबुलाल शेख, सोफीयान सादिक शेख, अजहर सादिक शेख, अलिज सादीक शेख, आसीफ नुरमोहम्मद कुरेशी, शहाबाज जब्बार कुरेशी, निसार कुरेशी यांच्यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झेंडीगेट परिसरामध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करताना आज दुपारी या परिसरामध्ये जेसीबी तसेच इतर साहित्य घेऊन कर्मचारी व त्यांचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी सुरुवातीला बूथ हॉस्पिटल येथील काही अतिक्रमण काढल्यानंतर पथक हे पुढच्या बाजूला म्हणजेच जुन्या महानगरपालिकेकडे येत असताना, अतिक्रमण काढून घ्या; अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी कर्मचाऱयांना अरेरावीची भाषा सुरू केली. कर्मचारी कारवाई करण्यासाठी जेसीबी घेऊन येत असताना संबंधित जमावाने त्यास रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचे रूपांतर नंतर दगडफेकीमध्ये झाले. यामध्ये जाधव हा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या ठिकाणी माहिती घेत कर्मचाऱयांना धीर दिला. याप्रकरणी जाधव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपींना अटक करेपर्यंत काम बंद आंदोलन
कर्मचाऱयावर जीवघेणा हल्ला झालेला असून, एकप्रकारे कर्मचाऱयांवर दहशत व दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आज झाला आहे. कर्मचारी रितसर काम करीत असून, ज्यांना कोणाला आक्षेप घ्यायचा असेल, त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱयांशी संपर्क करायला हवा होता. तसे न करता थेट टोकाचे पाऊल उचलले ही बाब अतिशय गंभीर असून, सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेचे कामकाज सुरू करू देणार नाही, असा इशारा महानगरपालिका युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिलेला आहे.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील चार ठिकाणच्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली होती. यामध्ये एक डॉ. थोलार हॉस्पिटलच्या रस्त्यासंदर्भातील होती, तर अन्य तक्रारी या वेगवेगळया स्वरूपाच्या होत्या. अतिक्रमण विभागाला बाबा बंगाली येथील जागेच्यासंदर्भात अभिप्राय आल्यानंतर या ठिकाणी जागा ही पालिका क्षेत्रातील आहे व त्या ठिकाणी झालेले अतिक्रमण दूर करण्यासाठी आज ही कारवाई मोहीम राबविण्यात आली. झालेला प्रकार हा गंभीर आहे. या प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हावी, अशी आमची भूमिका आहे.
– मीर लहारे, अतिक्रमण विभागप्रमुख, नगर मनपा.
























































