डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या भूलथापा, महिलेची 6 लाखांची ऑनलाइन फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मालाड येथे राहणाऱ्या प्राध्यापक महिलेला सायबर भामट्यांनी ऑनलाइन गंडा घातल्याची घटना घडली. दिल्ली विमानतळावर आपण पकडले गेलो असून जामिनाच्या नावाखाली महिलेची 5 लाख 92 हजार रुपयांची फसवणूक झाली. फसवणूकप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला या मालाड येथे राहतात. त्यांनी लग्न जुळणाऱया एका संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. सायबर भामटय़ाने गेल्या वर्षी महिलेला संकेतस्थळावरून एक रिक्वेस्ट पाठवली होती. भामट्याने नाव दिनेश मुखर्जी असल्याचे सांगितले. आपण मूळचे हिंदुस्थानी वंशाचे असून इंग्लंडमध्ये सध्या राहत असून व्यवसायाने डॉक्टर असल्याचे भासवले. ते प्रोफाईल पाहून तक्रारदार महिलेने वैयक्तिक माहिती भामट्याला पाठवली. त्यानंतर ही महिला त्या भामटय़ासोबत फोनवरून संपर्कात होती. हिंदुस्थानात आल्यावर कुटुंबीयांना भेटून आपण लग्नाची बोलणी करू अशा भुलथापा मारल्या. गेल्या डिसेंबरला महिलेला फोन आला. अडीच लाख युरो सोबत असल्याने दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडल्याच्या भामटय़ाने भुलथापा मारल्या. सीमा शुल्क विभागाचा दंड भरण्याकरिता 33 हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेला पुन्हा एक फोन आला. आपण इंग्लंड दूतावासातील वकील बोलतोय असे महिलेला भासवले.

भामटय़ाने विविध बँक खात्यांत पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे जमा केल्यावर मुखर्जीची सुटका होईल असे भासवण्यात आले. महिलेने त्यावर विश्वास ठेवून 5. 92 लाख रुपये जमा केले. पैसे जमा झाल्यावर भामटय़ाचा फोन बंद येऊ लागला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच महिलेने मालाड पोलीस ठाणे गाठले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याचे मालाड पोलिसांनी सांगितले.