
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून घडलेल्या दुर्घटनेत 23 जण वाहून गेले होते. त्यापैकी आतापर्यंत 19 जणांचे मृतदेह सापडले आहेत. एनडीआरएफ आणि स्थानिक मदत पथकांच्या सहाय्याने उर्वरित चारजणांचा शोध आज संध्याकाळपर्यंत सुरुच होता. काल गुरुवारपर्यंत 18 मृतदेह सापडले होते. आज रेश्मा रवींद्र चव्हाण यांचा मृतदेह सापडला़ तिवरे भेंडवाडीतील दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळूण नगरपरिषदेने 15 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आज पाच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिवरे धरण फुटून भेंडवाडीतील 23 जण वाहून गेले. होते.वाहून गेलेल्या ग्रामस्थापैकी 19 मृतदेह सापडले होते. त्यापैकी 18 जणांची ओळख पटली असून एका मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नव्हती. आज सकाळ एनडीआरएफ, जिद्दी माऊंटेनिअर्ससह अन्य शोधपथकांनी शोध मोहिमेला सुरुवात केली़ आज रेश्मा रवींद्र चव्हाण, वय, 45 यांचा मृतदेह सापडला़ सापडलेल्या मृतदेहांची संख्या आता 19 वर पोहोचली आहे. शोधपथकाने बळीराम चव्हाण यांना यापुर्वी जिवंत वाचवण्यात यश मिळवले आहे.
चिपळूण नगरपरिषदेने भेंडवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. आज पाच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये अजित चव्हाण, तानाजी चव्हाण, प्रतिक चव्हाण, बळीराम चव्हाण, विश्वास धाडवे या पाचजणांचा समावेश आहे. उर्वरित दुर्घटनाग्रस्तांना पुढील कालावधीत मदत देण्यात येणार आहे.
दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरते पुनर्वसन
तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतून बचावलेल्या ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. सध्या 26 ग्रामस्थांची तिवरे येथील शाळेच्या सभागृहात रहाण्याची व्यवस्था केली आहे. आज तहसीलदारांची पुनर्वसनाबाबत एक बैठक झाली. या बैठकीत शाळेपासून जवळ असलेल्या परिसरात दुर्घटनाग्रस्तांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाची व्यवस्था केली जाणार आहे. दुर्घटनाग्रस्तांसाठी नवीन घरे बांधून होईपर्यंत त्याठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था होणार आहे.
























































