
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून दुर्घटना घडली, या दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदत मिळावी अशी मागणी शिवसेना सचिव, संसदेतील गटनेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत व खासदार संजय मंडलीक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. नवी दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरु असताना बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलीक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात 2 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता तिवरे भेंडवाडी धरण फुटून झालेल्या दुर्घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली.
दुर्घटनेत 23 जण वाहून गेले. त्यापैकी 20 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. अनेक गुरेढोरे वाहून गेली. भेंडवाडीतील घरेदारे नष्ट झाली. अंदाजे 10 कोटी रूपयांपेक्षा जास्त नुकसान या दुर्घटनेमध्ये झाले आहे. त्यामुळे दुर्घटनाग्रस्त भेंडवाडीवासियांसाठी पंतप्रधान सहाय्यक निधीतून मदत मिळावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत चर्चा करुन आर्थिक मदत देण्यासाठी सहमती दर्शवली. तसेच घटनेची संबंधित खात्याकडून तात्काळ चौकशी करुन त्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
























































