एका रात्रीत शासकीय रूम रिकामी करण्याचे आदेश; महुआ मोईत्रा यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्याच्या प्रशासनावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गंभीर आरोप केला आहे. कृष्णानगर येथील सरकारी सर्किट हाऊसमध्ये सरकारने दिलेल्या खोली रिकामी करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भातील काही फोटो त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले आहे.

शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता महुआ मोईत्रा सर्किट हाऊसवर पोहोचल्या होत्या. त्यांना नेहमीप्रमाणेच त्यांची ठरलेली खोली देण्यात आली होती. परंतु रात्री साडेनऊच्या सुमारास जेवण आल्यानंतर, अवघ्या काही मिनिटांतच त्यांना ती खोली ताबडतोब रिकामी करण्यास सांगण्यात आले. यानंतर सुमारे 11 वाजताच्या सुमारास यासंदर्भातील अधिकृत आदेशही पाठवण्यात आला. यासंदर्भातील व्हॉट्सअॅप चॅटचे स्कीनशॉर्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दरम्यान यावेळी सर्किट हाऊसबाहेर मोठी गर्दी जमली होती. या जमलेल्या लोकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याचा आरोप मोईत्रा यांनी केला. एका लोकप्रतिनिधी महिलेला स्वतःच्याच मतदारसंघात अशा प्रकारे मध्यरात्री त्रास देणे अत्यंत लाजिरवाणे असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मला एक विद्यमान खासदार म्हणून नियमांनुसार सरकारी सुविधा मिळायला हव्यात, परंतु मला जाणूनबुजून त्रास देण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार घडवून आणला गेला आहे. प्रशासनाच्या या दबावापुढे आपण कधीही मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार महुआ मोईत्रा यांनी व्यक्त केला आहे.