
ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव कार ट्रकला धडकल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन चिमुकल्यांसह पाच जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावर शुक्रवारी रात्री 11.30 वाजता हा अपघात झाला. अपघातात तीन महिलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रतलाम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कारमधील सर्वजण एकाच कुटुंबातील होते आणि खाटू श्याम मंदिरात दर्शनासाठी चालले होते. ओव्हरटेक करताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. जखमींना रतलाम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांना माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. शिवगड पोलीस प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत असून इतर आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहे.





























































