
झारखंड लोकसेवा आयोगात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी रांचीत विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून विश्वजीत कुमार असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजीत झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील रहिवासी आहे . कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर शुक्रवारी विश्वजीत कुमारला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी सनोज चौधरी यांनी पीटीआयला सांगितले, “आंदोलकांना चिथावणी दिल्याबद्दल आणि मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याबद्दल विश्वजीत कुमार यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेनुसार (IPC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या विरोधात नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार आंदोलन करत असताना, आरोपीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
दरम्यान, विधानसभा मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्या समाजकंटकांना ओळखण्यासाठी पोलीस व्हिडिओ फुटेजची तपासणी करत आहेत. मोर्चादरम्यान आंदोलक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात संघर्ष झाला आणि त्यानंतर 300 अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. या हिंसाचारासंदर्भात एफआयआर दाखल केल्याबद्दल आंदोलकांनी रांची जिल्हा प्रशासनावर टीका केली आहे. ‘तिरंगा यात्रा’ त्यांच्या आंदोलनाला आणखी बळकट करेल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आंदोलनाच्या समर्थनार्थ उपोषणावर बसलेल्या देवेंद्र महातो यांनी दावा केला की, जयपाल सिंग मुंडा स्टेडियममध्ये परतण्याची परवानगी मिळावी म्हणून त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि सिव्हिल सर्जन यांच्याकडे वारंवार विनंती केली, मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यांनी आरोप केला की, “काही लोक मला आंदोलनाच्या ठिकाणापासून दूर ठेवून आंदोलनाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत.”





























































