
मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर अशा दोन्ही मार्गिकांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाईनवर ठाणे ते कल्याण दरम्यान आणि हार्बर लाईनवर पनवेल ते वाशीदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात हार्बरवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते पनवेल लोकलसेवा पाच तासासाठी बंद राहणार आहे.
मेन लाईनवर ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात जलद गाड्या ठाणे आणि कल्याणदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच सीएसएमटी/दादर येथून सुटणाऱ्या मेल-एक्सप्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जातील. सीएसएमटी/दादर येथे येणाऱ्या मेल-एक्सप्रेस कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान 6 व्या मार्गावर वळवल्या जातील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
हार्बरवर पनवेल-वाशीदरम्यान सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी येथून बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या लोकल सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत रद्द राहतील. तसेच पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीला येणाऱ्या लोकल सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत रद्द राहणार आहेत. ठाणे येथून पनवेल येथे जाणाऱ्या लोकल सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या वेळेत रद्द राहतील आणि पनवेल येथून ठाणे येथे येणाऱ्या लोकल सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या वेळेत रद्द राहतील, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.




























































