देशात ९४ हजार शाळा बंद, ज्या सुरू आहेत तिथे मूलभूत सुविधा नाहीत; अभिजीत दिपके यांची ‘शाळा ठीक करा’ मोहीम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉकरोच जनता पार्टीच्या ‘शाळा ठीक करा’ मोहिमेची सुरुवात आज महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी गावातून झाली. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या मोहिमेदरम्यान सरपंचांचे आभार मानले. ते म्हणाले, “मी सरपंचांचा आभारी आहे. त्यांनी आठ दिवसांच्या आत शाळेत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.”

दिपके म्हणाले की, शिक्षकांचे फक्त एकच काम असायला हवे, ते म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणे. इतर कामांसाठी वेगळ्या लोकांची नियुक्ती केली गेली पाहिजे. देशात अनेक बेरोजगार तरुण आहेत, त्यांच्यावर या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. गेल्या १० वर्षांत देशात जवळपास ९४ हजार शाळा बंद झाल्या आहेत. स्वातंत्र्याला ८० वर्षे उलटूनही शाळांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा नाहीत. तुम्ही नक्की करत काय आहात? ५० खोके, एकदम ओके! आज संतुक पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रांगोळी काढण्याच्या कामाने या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

दिपके म्हणाले की, ही मोहीम सरपंच आणि गावातील लोकांना शाळांमधील उणिवा शोधण्यासाठी आणि त्या दुरुस्त करण्यासाठी प्रेरित करेल. ते म्हणाले की, या मोहिमेत मुख्य लक्ष वीज, पिण्याचे पाणी, मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहे आणि चांगले माध्यान्ह भोजन यांसारख्या आवश्यक गोष्टींवर असणार आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता ही मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी आधीच सांगितले होते.