बंगालमधील टीटीपी संशयित दहशतवाद्याला बंगळुरुत अटक, पाकिस्तानी सैन्यावर हल्ल्याचा होता कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरु पोलिसांनी ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. असफुल मल्लिक (25) असे संशयित दहशतवाद्याचे नाव असून, तो पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नौपारा गावचा रहिवासी आहे. मल्लिक डिसेंबर 2025 पासून जिगानी औद्योगिक क्षेत्रातील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मल्लिकने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता, असे पोलिसांनी सांगितले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, संशयास्पद ऑनलाइन हालचाली आणि दहशतवादी गटांशी कथित संबंधांमुळे असाफुल मलिक याला बंगळुरूच्या जिगनी परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बोम्मासंद्रा औद्योगिक क्षेत्रात गस्त घालत असताना पोलिसांना पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचालींबद्दल माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी मल्लिकची चौकशी केली. चौकशीत मल्लिकने कथितरित्या कबूल केले की, पाकिस्तानमधील मुस्लिमांवर पाकिस्तानी लष्कराकडून होणारे अत्याचारामुळे तो संतप्त होता. तसेच, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाबाबत पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेबद्दलही त्याने संताप व्यक्त केल्याचे समजते. हिंदुस्थानातील मुस्लिमांना अडचणींचा सामना करावा लागल्यास प्रत्युत्तर देण्याबाबत मलिकला कथितरित्या प्रवृत्त केले जात होते.

मल्लिकने फेसबुकद्वारे अफगाणिस्तानमधील इम्रान हैदर नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. मल्लिकने अफगाणिस्तानला जाण्यासाठी इम्रान हैदरची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता आणि व्हिसासाठी अर्जही केला होता. त्यानंतर पोलिसांना मल्लिकच्या मोबाईलमध्ये त्याच्या आणि इम्रान हैदर यांच्यातील चॅट्स, अनेक व्हॉइस कॉल्स आणि ऑडिओ संभाषणांची नोंद आढळून आली. आरोपीच्या मोबाईल फोनमधून मिळालेले चॅट्स, व्हॉइस रेकॉर्डिंग्ज आणि इतर माहितीची पोलीस तपासणी करत आहेत.