
ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले, हे अतिशय अयोग्य आहे आणि कोणत्याही संविधानाच्या चौकटीत बसत नाही. निवडणूक आयोगाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला, ते एका सशक्त लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून अदृश्य शक्तींनी दोन घटनात्मक पक्ष फोडण्याचे पाप केले, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानानुसार पक्ष ठरवण्याचा अधिकार आमदार किंवा खासदारांच्या मतदानाला नसून, तो मूळ पक्ष स्थापन करणाऱ्यांकडेच राहतो. शरद पवार हे पक्षाचे ‘फाउंडर मेंबर’ (संस्थापक सदस्य) आहेत आणि प्रत्येक कागदपत्र त्यांच्याच बाजूने आहे. निवडणूक आयोगाने शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला आणि आमच्यावर अन्याय केला. आम्हाला सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ मिळते आहे, पण सुनावणीसाठी वेळ मिळत नाही, हे मोठे दुर्दैव असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शिवसेना ही फक्त उद्धव ठाकरे यांचीच
शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली आणि ते हयात असताना त्यांनी ती उद्धवजींच्या हातात दिली. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी शिवसेना ही फक्त उद्धव ठाकरे यांचीच आहे. कोणाचे वेगळे मत असते, तर त्यांनी राज ठाकरेंसारखी वेगळी चूल मांडून स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहायला हवे होते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांचाच आहे. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, तोपर्यंत मी ही लढाई कार्यकर्त्यांसाठी आणि देशाचे संविधान वाचवण्यासाठी लढत राहणार.






























































