
मीरा-भाईंदर महापालिकेच्या स्टॉल वाटप योजनेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. काशिमीरा परिसरातील एका लॉजिंग व बारचा मालक पालिकेला वर्षाला १२ लाख रुपये कर भरतो. तरीही या व्यक्तीला महापालिकेने स्टॉल दिला आहे. पालिका महासभेत हा भंडाफोड झाल्यानंतर ऐकावं ते नवलच अशा प्रतिक्रिया व्यक्त करत नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली. गरजू व लघु व्यावसायिकांसाठी असलेल्या स्टॉल योजनेचा लाभ धनदांडग्या व्यक्तीला कसा मिळाला, असा संताप नागरिकांमध्ये आहे.
मीरा-भाईंदर शहरात पालिकेत एकूण ५८९ स्टॉल आहेत. त्यात दिव्यांग १५५, गटई स्टॉल ३१४ व दूधविक्री स्टॉल ८६ आणि ज्यूस सेंटर, वृत्तपत्र विक्रेते व अन्य असे ३४ स्टॉल आहेत. याशिवाय नवीन स्टॉलसाठी ४१८ अर्ज आले आहेत. स्टॉल वाटपात मेमसाब बार अँड रेस्टॉरंटचे मालक अब्दुल करीम शेख यांना काशिमीरा येथील डेल्टा गार्डन इमारतीसमोर महापालिकेने स्टॉल दिला आहे. भाजपचे प्रभाग समिती क्र. ६ चे प्रभाग अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत दळवी यांनी हा मुद्दा महासभेत उपस्थित करून महापौर आणि पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. महापालिकेच्या स्टॉल वाटपाबाबत आणखी गंभीर आरोपही महासभेत झाले. स्टॉल वाटप करताना एका व्यक्तीला तब्बल पाच स्टॉल देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले असून स्टॉल वाटपाबाबत धोरण निश्चित करण्यासाठी ठरावही पारित करण्यात आला.






























































