‘लगता हैं साहब ने उर्दू में तिरंगा पहना है’, काँग्रेसचा पंतप्रधान मोदींच्या जॅकेटवरील तिरंग्यावरून निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा 80 वा स्वातंत्र्यदिन देशभरामध्ये उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्ताने परंपरेप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी परिधान केलेल्या पारंपरिक पेहरावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र याच पेहरावावर घातलेल्या जॅकेटवर मोदींनी तिरंगी रंगाचा पॉकेट स्क्वेअर लावला होता. त्याच्या क्रमावरून आता काँग्रेस नेते पवन खेडा यांनी मोदींवर उपरोधिक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यानंतर पवन खेडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत मोदींच्या पेहरावावर टीका केली. हिंदीमध्ये लिहिलेल्या पोस्टमध्ये खेडा म्हणाले, “वाटतंय साहेबांनी उर्दूमध्ये तिरंगा परिधान केला आहे. किंवा मग ते हिंदुस्थानऐवजी आयर्लंडचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 13 व्यांदा लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. या ऐतिहासिक प्रसंगी त्यांनी खास पेहराव परिधान केला होत. मोदींनी डोक्यावर लाल रंगाचा पारंपारिक राजस्थानी बंधेज चुनरी साफा अर्थात फेटा बांधला होता. तसेच पांढरा कुर्ता आणि त्यावर तपकिरी रंगाचे जॅकेट घातले होते. जॅकेटच्या खिशावर राष्ट्रध्वजातील केशरी, पांढरा आणि हिरवा रंग दर्शवणारे पॉकेट स्क्वेअरही लावण्यात आले होते. मात्र याचा क्रम चुकल्याचे म्हणत पवन खेडा यांनी मोदींवर निशाणा साधला

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यदिनाच्या देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. ज्यांच्या त्याग, धैर्य आणि समर्पणामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, अशा अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे आपण कृतज्ञतेने स्मरण करतो. विकसित भारत घडवण्याच्या आमच्या प्रवासात त्यांची स्वप्ने आम्हाला सातत्याने प्रेरणा देतात. 140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्याने आपला देश विविध क्षेत्रांत प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे, असे मोदी म्हणाले.