पंतप्रधानांचा महिला आरक्षणाचा मुद्दा खोटा आणि ढोंगीपणाचा; जयराम रमेश यांची घणाघाती टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात महिला आरक्षणाबाबत केलेल्या आवाहनावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सडकून टीका केली आहे. “पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून महिला आरक्षणासाठी केलेले आवाहन हे खोटे आहे. केंद्र सरकारच्या दुटप्पी ढोंगीपणामुळेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत याची अंमलबजावणी होऊ शकली नाही,” असा घणाघात रमेश यांनी केला आहे.

X वर एक पोस्ट शेअर करताना जयराम रमेश म्हणाले, “सप्टेंबर २०२३ मध्ये संसदेने नारी शक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) एकमताने मंजूर केला होता. हे पंतप्रधानांना माहीत असले पाहिजे. पण मोदी सरकारच्या दुटप्पी आणि ढोंगी भूमिकेमुळेच २०२४ च्या निवडणुकांपासून तो लागू होऊ नये, याची काळजी घेण्यात आली. हा कायदा अगदी घाईघाईने आणि गुपचूप १६ एप्रिल २०२६ च्या संध्याकाळी उशिरा अधिसूचित करण्यात आला.”

१९९३ च्या घटनादुरुस्तीची आठवण

रमेश यांनी पुढे म्हटले आहे की, महिला आरक्षणाची मूळ संकल्पना १९९३ मध्ये ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीअंतर्गत मांडण्यात आली होती आणि राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी व निर्धारामुळेच हे शक्य झाले. “सध्याच्या लोकसभेच्या क्षमतेनुसार २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपासून महिला आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे,” असेही ते म्हणाले.