
बिहारमधील वाढती गुन्हेगारी आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन या मुद्द्यांवरून पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण १६ ऑगस्ट रोजी राजधानी पाटणा येथे उपोषणाला बसणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदभात वृत्त दिले आहे.
बिहारमधील हाजीपूर येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी आले असता पप्पू यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पाटण्यातील गर्दनीबाग येथे आपण हे उपोषण करणार आहोत. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण सतत वाढत आहे, मात्र सरकार यावर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, सतत होणाऱ्या हत्या, बिहार लोकसेवा आयोग मधील समस्या आणि हिंदीच्या तुलनेत इंग्रजी भाषेला ८० टक्के अधिक प्रोत्साहन देण्याचे धोरण या सर्वांच्या विरोधात हे उपोषण असणार आहे.
अमित शहा यांच्यावरही साधला निशाणा
यावेळी पप्पू यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत विरोधकांचे आंदोलन सुरूच राहील. राहुल गांधी त्यांना सोडणार नाहीत, त्यांना एक दिवसही शांत झोपू देणार नाहीत. पंतप्रधान मोदींच्या स्वप्नात राहुल गांधी रोज येतील.”
पप्पू यादव यांनी सरकारला इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. गरज पडल्यास आपण बेमुदत उपोषणाला बसू, आणि त्यानंतर बिहार बंदची हाकही देऊ, असे ते म्हणाले.





























































