एमबीबीएस विद्यार्थ्यांचा आजचा पहिला दिवस ‘गुरुमंत्राविना’; अस्थायी प्राध्यापकांचे असहकार आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या संपाचा फटका एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या नव्या बॅचला बसणार आहे. या वर्षी प्रवेश घेतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा कॉलेजचा उद्या सोमवारी पहिला दिवस आहे. प्राध्यापकांनी शिकवण्याबरोबरच प्रशासकीय कामही सध्या बंद केले आहे. उद्या पहिल्या दिवशी एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना डीनचे मार्गदर्शन व ओरीएंटेशन होते. पण अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या असहकार आंदोलनामुळे पहिल्या दिवशी डीनमार्फत दिल्या जाणाऱया गुरुमंत्राला मुकावे लागणार आहे.

मुंबईसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवा नियमित कराव्यात या मागणीसाठी 17 जानेवारीपासून जे. जे. रुग्णालयात साखळी उपोषण पुकारण्यात आले आहे. या साखळी उपोषणात राज्यातल्या सर्व 18 वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकही सहभागी होत आहेत.

अस्थायी प्राध्यापकांना सेवेत सामावून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. राज्यभर आंदोलन सुरू आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत असहकार आंदोलन सुरू आहे. या असहकार आंदोलनाचा एक भाग म्हणून टीचर्स असोसिएशनचा बहिष्कार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामे व शिकवणे बंद आहे. यंदा कोविडमुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश विलंबाने झाले आहेत, पण एमबीबीएस विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आहे.

पहिला दिवस डीनचा

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पहिल्या दिवशी डीन म्हणजे बोमन इराणी विद्यार्थ्यांना यशाचा गुरुमंत्र देतो त्याच धर्तीवर मेडिकलच्या पहिल्या वर्षाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन मार्गदर्शन करणार होते, पण आता या असहकार आंदोलनामुळे डीनचे मार्गदर्शन होणे कठीण आहे.

…तर ओपीडी बंद पाडणार  

दरम्यान, मागील 26 दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाकडे वैद्यकीय शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एवढे दिवस आंदोलन करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर रुग्णालयातील आपत्कालीन सेवा वगळून ओपीडी सेवा बंद करण्याचा संघटनेने दिला आहे. त्यावर एक-दोन दिवसांत निर्णय होईल, असे महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक असोसिएशनच्या  मुंबई विभागाचे सरचिटणीस डॉ. दिनेश ढोडी यांनी सांगितले.

एकाच पगारावर काम कसे करणार?

तुमच्या नियुक्त्या करताना सेवेत सामावून घेणार नाही असे स्पष्ट केलेले असते याकडे संघटनेच्या प्रतिनिधींचे लक्ष वेधले असता, एखादी व्यक्ती पाच-सहा वर्षे एमडी, एमएस व सुपरस्पेशालिटी करीत 12 ते 15 वर्षे शिकते. पुढे अस्थायी म्हणून एकाच पगारावर कसे राहतील, असा प्रश्न त्यांनी केला. वेतनवाढ होत नाही. चार महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती होते. पूर्वी एक वर्षाचे देत होते. वैद्यकीय सेवा, लेक्चरची कामे अस्थायी पद्धतीवर सुरू राहिली तर यंत्रणा कशी चालेल, असा सवाल केला. या लोकांना सेवेत घेतले तर मनापासून काम करतील असा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला.

सचिवांच्या अरेरावीवर नाराजी

महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संघटनेच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अपमानित करून दालनाबाहेर काढले होते. त्यावरून डॉक्टरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यासंदर्भात डॉ.  दिनेश ढोडी म्हणाले की, तेव्हा जर सचिवांनी जर दोन मिनिटे वेळ दिला असता तर तो प्रकार घडलाच नसता. आम्ही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो होतो, पण आम्हाला सचिवांची भेट घेण्यास सांगितले. सचिवांनी आमच्या मागण्यांबाबत दोन मिनिटे वेळ दिला असता तर काही झाले नसते. भेटीला गेलो तेव्हा हाकलण्याची भाषा करतात. भिकेला लावल्यासारखे केले तर कसे होणार आणि हे कधीपर्यंत चालणार, असा प्रश्न केला.

प्रमुख मागण्या

300 अस्थायी सहाय्यक प्राध्यापक आहेत त्यांना सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी आहे. यापूर्वी 2009 व 2016 मध्ये नियमित केले आहेत. त्याशिवाय सातव्या वेतन आयोगातील भत्त्याची मागणी आहे. सातव्या वेतन आयोगाचे पूर्ण भत्ते लागू  झाले नाही. जुन्या बेसिक वेतनावर भत्ते मिळत आहेत. काही नवीन भत्ते लागू झालेले नाही. नॉन प्रॅक्टिसिंग अलाऊन्स हा सहाव्या वेतनश्रेणीच्या आधारावर मिळत आहे. प्रत्येक महिन्याला सरासरी 30 ते 35 हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला.

अधिवेशनात पडसाद

सचिवांच्या वर्तणुकीचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. सचिवांच्या अरेरावीबद्दल डॉक्टर्स विरोधी पक्षनेत्यांची भेट घेणार आहेत. यापूर्वीच  सर्वांना पत्र दिले आहे. मागील अधिवेशनात विभागाचे मंत्री अमित देशमुख यांनी अधिवेशनात आश्वासन दिले होते. आमदार अमीन पटेल यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, पण तरीही यामध्ये मार्ग निघालेला नाही.

आपत्कालीन सेवा सुरूच  

डॉक्टरांनी संप पुकारल्यास रुग्णसेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद पडू शकते. संप पुकारला तरीही आपत्कालीन सेवा व कोविड सेवा बंद पडू देणार नाही. निमयित ओपीडी व नियमित शस्त्रक्रिया बंद पडू शकतात. पण त्यापूर्वी सरकारने काही तरी वेळ देऊन यात मार्ग काढावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.