हिंदुस्थानची चार पदके पक्की, विंकी, अल्फिया, गीतिका, पूनम उपांत्य फेरीत

युवा विश्वचषक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानची चार पदके पक्की झाली आहेत. विंकी, अल्फिया पठाण, गीतिका व पूनम यांनी आपापल्या गटातून उपांत्य फेरीत धडक दिली आहे. पुरुष गटात सुमित व मनीष हे पदकापासून एक पाऊल दूर आहेत. दोघांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

विंकीने उपांत्यपूर्व लढतीत कोलंबियाच्या पॅमिलो पॅमेलाचा 5-0 ने धुव्वा उडवीत आगेकूच केले 2019 मधील आशियाई ज्युनियर चॅम्पियन अल्फियाने 81हून अधिक वजनी गटात हंगेरीच्या रेका हॉफमॅन हिचा पराभव केला. पूनमने कझाकिस्तानची बॉक्सर नाजके सेरिक हिचा एकतर्फी उपांत्यपूर्व लढतीत 5-0 गुणांनी पराभव केला. गीतिकाने 48 किलो गटात रोमानियाच्या एलिझाबेथ ओस्टर हिला पराभूत केले. गीतिकाने रिंगमध्ये उतरताच सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी खेळाडूवर वर्चस्व गाजविले. त्यामुळे पंचांनी तिला पहिल्या फेरीतच विजयी घोषित केले.

मात्र, 81 किलो गटात हिंदुस्थानच्या खुशीला उपांत्यपूर्व लढतीत हार पत्करावी लागली. तिला तुकाaच्या बुसरा इसिल्डरने हरविले. पुरुषांच्या 60 किलो गटात आकाश व 81 किलो गटात विनित यांनाही उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

मनीष, सुमितचे आगेकूच

पुरुष गटात सुमित व मनीष या हिंदुस्थानी खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून, ते पदकापासून एक पाऊल दूर आहेत. सुमितने जॉर्डनच्या अब्दुल्लाह लारगचा 5-0 गुणफरकाने पाडाव केला, तर मनीषने स्लोव्हाकियाच्या लादिस्लाव होरवाथलाही याच गुणफरकाने बाहेरचा रस्ता दाखविला.

आपली प्रतिक्रिया द्या